पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजीनाम्याची मागणी

म्हापसा येथे वाढती महागाई विरोधात प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीने म्हापशात काढलेला निषेध मोर्चा.
म्हापसा : वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि घरगुती गॅसच्या गगनाला भिडलेल्या किमती यामुळे सर्वसामान्य कुटुंबांवर आर्थिक बोझा पडला आहे. या महागाईच्या विरोधात गोवा प्रदेश महिला काँग्रेसतर्फे म्हापसा शहरात एक भव्य निषेध मोर्चा काढून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
शनिवारी ६ रोजी सायंकाळी म्हापशातील गांधी चौक ते हुतात्मा चौक पर्यंत गोवा प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. प्रतीक्षा खलप यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. या मार्चा आंदोलनात काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, सहप्रभारी डॉ. अंजली निंबाळकर, सचिव प्रज्योती हांदोरे, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
यावेळी बोलताना माणिकराव ठाकरे यांनी भाजप सरकारवर कडाडून टीका करताना सांगितले की, भाजप सरकारने देशाला महागाईच्या खाईत लोटल्याने आज प्रत्येक नागरिक चिंतेत आहे. सर्वसामान्य जनता आणि महिलांना घर चालवणे कठीण बनले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडवले आहेत. मोदी जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा ते तत्कालीन काँग्रेस सरकार आणि पंतप्रधानांवर रुपयाच्या घसरणीवरून सतत आरोप करत होते. आज त्यांच्याच काळात रुपयाची ऐतिहासिक घसरण झाली आहे. मोदी सरकार सर्वसामान्यांना वार्यावर सोडून अदानी आणि अंबानींसारख्या आपल्या श्रीमंत मित्रांचे लाड पुरवत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी २०१४ नंतर एलपीजी सिलिंडर आणि इतर जीवनावश्यक वस्तूंवर करांचे ओझे वाढवून बहुजन, मध्यमवर्गीय आणि गरीब जनतेला होरपळून काढल्याचा आरोप केला.
महिला प्रदेशाध्यक्षा डॉ. प्रतीक्षा खलप यांनी भाजपच्या दुटप्पी भूमिकेवर जोरदार टीका केली. २०१४ मध्ये महागाईच्या मुद्द्यावर खोटा प्रचार करून मोदींनी सत्ता मिळवली. 'अच्छे दिन'चे आश्वासन देऊन त्यांनी आज जनतेवर 'बुरे दिन' लादले आहेत. डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना रुपया घसरल्यास देशाची प्रतिष्ठा घसरते, असे म्हणणारे मोदी आज गप्प का? आम्ही त्यांना त्यांच्याच शब्दांची आठवण करून देण्यासाठी रस्त्यावर उतरलो आहोत, असे डॉ. खलप म्हणाल्या.
चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे जनता होरपळली
सहप्रभारी डॉ. अंजली निंबाळकर म्हणाल्या, मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळेच आज देश महागाईचा मारा सहन करत आहे. व्यापारी वर्गापासून ते सर्वसामान्य माणसापर्यंत प्रत्येक घटकाला याचा मोठा फटका बसला असून भाजपला याचे उत्तर जनतेला द्यावेच लागेल.