पुढील १५ दिवसांत प्रदेश काँग्रेसच्या समित्यांची करणार स्थापना

माणिकराव ठाकरे : १८ जून रोजी क्रांती दिनाच्या कार्यक्रमात घोषणा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
06th June, 11:49 pm
पुढील १५ दिवसांत प्रदेश काँग्रेसच्या समित्यांची करणार स्थापना

पणजी : पुढील १५ दिवसात गोवा प्रदेश काँग्रेसच्या विविध समित्यांची तसेच काही नव्या समित्या स्थापना करण्यात येणार आहे. समितीमध्ये नवे, जुने कार्यकर्ते असतील. १८ जून रोजी पक्षातर्फे होणाऱ्या क्रांती दिनाच्या कार्यक्रमात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी विविध उपक्रमांची घोषणा केली जाणार असल्याचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. शनिवारी पणजीत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सहप्रभारी अंजली निंबाळकर, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
ठाकरे यांनी सांगितले की, नवीन समित्यांची नियुक्ती झाल्यावर सर्व मतदारसंघांत कामांना वेग येणार आहे. गोव्यातील जनता भाजपला कंटाळली आहे. जनतेला बदल हवा आहे. यादृष्टीने आम्ही जनतेचे विचार लक्षात घेऊनच विविध उपक्रम राबवणार आहोत. प्रदेश अध्यक्ष बदलण्याचा निर्णय काँग्रेस हायकमांडचा आहे. यामुळे काहीजण नाराज असू शकतात. मात्र खरा काँग्रेस कार्यकर्ता आपल्या नाराजीमुळे पक्षाचे नुकसान करत नाही. आम्ही देखील कुणाचे नुकसान करणार नाही. पक्ष कुणा एकट्याचा नसतो. आम्ही गोव्याच्या हितासाठी सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाणार आहोत.
अंजली निंबाळकर म्हणाल्या, प्रदेशाध्यक्ष बदलण्यापूर्वी राज्यातील सर्व आमदार व पदाधिकाऱ्यांची मते लक्षात घेतली आहेत. सर्वांना दिल्लीत बोलावून त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलणे झाल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. मात्र, पक्षाने हाच निर्णय का घेतला याबाबत आम्ही काही सांगू शकत नाही. अन्य राज्यात देखील असे निर्णय घेतले गेले आहेत. हायकमांडचे स्वतःचे देखील सर्वेक्षण असते. आम्ही पक्षाचे कार्यकर्ते आहोत, पक्ष जो निर्णय घेईल तो सर्वांनीच मान्य केला पाहिजे.
लोबो दाम्पत्यांना घेणे ही चूक
गिरीश चोडणकर म्हणाले की, लोबो दाम्पत्यांना पक्षात घेऊन त्यांना तिकीट देणे ही आमची चूक झाली. यापुढे पक्षांतर करणाऱ्यांना पक्षात प्रवेश मिळणार नाही. आम्ही पुढील काही दिवसांत पक्ष संघटना अधिक मजबूत करणार आहोत. जिल्हा, राज्य व अन्य समित्यांची पुनर्रचना करण्यात येणार आहे.
पक्ष सर्वप्रथम : युरी आलेमाव
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले की, पक्षाने घेतलेला निर्णय आम्ही मान्य केला आहे. आमच्यासाठी पक्ष सर्वप्रथम आहे. आम्ही सर्व एकत्रितपणे भ्रष्ट जुमला पार्टीला सत्तेवरून हटवणार आहोत.                   

हेही वाचा