मंदिरांनजीक बीफची दुकाने नको; बजरंग दलाची मागणी

मडगाव : रुमडामळ हाऊसिंग बोर्ड येथील बेकायदा फूड स्टॉल्सविरोधात बजरंग दलाकडून आंदोलनाची हाक देण्यात आली होती. त्याआधीच सदर स्टॉलधारकाने सर्व साहित्य हटवले. यानंतर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी मोर्चा काढत पंचायतीने उर्वरित शेडही लवकर मोडून टाकावी, तसेच मंदिरांनजीक बीफची दुकाने नको, अशी मागणी केली.
रुमडामळ हाउसिंग बोर्ड येथील फास्ट फूड स्टॉल्सवर शुक्रवारी रात्री बजरंग दलाच्या गोरक्षा समितीचे पदाधिकारी भगवान रेडकर यांना स्टॉलधारकाने मारहाण केली. रेडकर यांच्यावर दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उपचार सुरू आहेत. यानंतर मायना कुडतरी पोलिसांनी संशयित सलमानवर प्रतिबंधात्मक अटकेची कारवाई केली व बॉण्ड दिल्यानंतर त्याची सुटका केली. या घटनेनंतर बजरंग दलाकडून शनिवारी सायंकाळी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. शनिवारी सकाळी न्यायदंडाधिकार्यांनी पंचायत, आरोग्य खाते, अग्निशामक दल, एफडीए व इतर खात्यांना सदर आस्थापनाला कोणते परवाने दिलेले आहेत का, याची पडताळणी करण्यास सांगितले. परंतु, सदर फूड स्टॉल हा बेकायदेशीरपणे उभारलेला असल्याने स्टॉलधारकाने तेथील साहित्य हटवले. या पार्श्वभूमीवर रुमडामळ हाउसिंग बोर्ड परिसरात १०० पेक्षा जास्त पोलीस तैनात करण्यात आले होते.
या घटनेबाबत बजरंग दलाचे संयोजक विराज देसाई यांनी सांगितले की, या स्टॉल्सवर एक युवक गेला. त्याने मेनू कार्ड मागितले असता, मालकाने मेनू कार्ड नाही. काही घ्यायचे असल्यास घे नाहीतर वाटेला लाग, असे सांगितले व शिवीगाळही केली. यानंतर सदर युवकाने रेडकर यांना कॉल केला. रेडकर स्टॉलवर पोहोचताच सदर स्टॉलमालकाने त्यांना मारहाण केली. हा प्रकार पूर्वनियोजित होता. मडगावातील स्टॉल्स साडेदहा वाजता बंद केले जातात पण हाऊसिंग बोर्ड व नावेलीतील स्टॉल्स रात्रभर सुरू असतात. याबाबतही कारवाई आवश्यक आहे. तसेच मंदिरानजीकचे बीफ व मांसाहारी स्टॉल्स बंद करण्याची मागणीही पोलिसांकडे करण्यात आली.
भगवान रेडकर याने हप्ता मागण्यासाठी संदीप शिरोडकर नामक व्यक्तीला सलमान याच्या दुकानावर पाठवले होते. बेकायदेशीर दुकान सुरू असून हप्ता देण्याची मागणी केली होती. त्याने नकार दिल्यानंतर भगवान फास्ट फूड स्टॉलवर आला व त्यानंतर शाब्दिक वाद व हाणामारी झाली. हा प्रकार बजरंग दलाचे विराज देसाई व गोरक्षा विभागाचे भगवान यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात येत आहे, असे ॲड. प्रतिमा कुतिन्हो व पंच उमरान यांनी सांगितले.