पंखा दुरुस्त करताना एकाचा, लोखंडी शिडी वीज वाहिनीला लागल्याने दुसऱ्याचा मृत्यू

मडगाव : येथील खारेबांध- शिरवडे भागात छताचा पंखा दुरुस्त करताना विजेचा धक्का लागून संजय डोंगरे (५३, मूळ महाराष्ट्र) यांचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत बाळ्ळी-केपे येथील एका फार्ममध्ये लोखंडी शिडी वीज वाहिनीला लागल्याने विजेचा धक्का लागून २१ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला.
३ जून रोजी रात्री १०.३० वा.च्या सुमारास मडगाव जिल्हा इस्पितळातून मडगाव पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. संजय डोंगरे यांना रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांनी खारेबांध येथून बेशुद्ध अवस्थेत इस्पितळात दाखल केले होते, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
मडगाव पोलीस उपनिरीक्षक संजय वेळीप यांनी या प्रकरणाची चौकशी केली. संजय डोंगरे हे खारेबांध येथील एका भाड्याच्या खोलीत एकटेच राहत होते. घटनेच्या वेळी ते आपल्या खोलीतील छताचा पंखा दुरुस्त करत होते, यादरम्यान त्यांना विजेचा जोरदार धक्का लागला. त्यांचे भाऊ बालाजी डोंगरे यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात ही माहिती दिली.
या प्रकरणी मडगाव पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली.
बाळ्ळी-केपे येथील फार्ममध्ये विजेचा धक्का लागून कामगाराचा मृत्यू
बाळ्ळी-केपे येथील एका फार्ममध्ये काम करत असताना विजेचा धक्का लागून २१ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. दिलीप सिंग (२१, मूळ रा. झारखंड) असे मृत युवकाचे नाव आहे. या प्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली.
३ जून रोजी सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास बाळ्ळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कुकळ्ळी पोलिसांना घटनेची माहिती दिली. बाळ्ळी- केपे येथील डीजे कोकोनट फार्ममध्ये दिलीप सिंग हा कामगार काम करत होता.
काम करत असताना शिडी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेत असताना, शिडी जवळून जाणाऱ्या विजेच्या मुख्य वाहिनीला लागली. यामुळे दिलीप याला विजेचा तीव्र झटका बसला. त्याला बाळ्ळी आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच कुंकळ्ळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. सध्या मृतदेह शवचिकित्सेसाठी मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे.
कुंकळ्ळी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली. पोलीस उपनिरीक्षक आदित्य सावंत पुढील तपास करीत आहेत.
दोन दिवसांत तिसरी घटना
हडफडे येथील पार्क रेगीस हॉटेलमध्ये आयोजित एका पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी लागणाऱ्या विद्युत रोषणाईचे काम करताना बुधवारी विजेचा धक्का लागून अनिकेत मारूती पाटील (२४, रा. बेळगाव) या इलेक्ट्रीशयनचा मृत्यू झाला होता. हॉटेलच्या अंतर्गत भागात एलईडीदिवे बसवताना अचानक त्याला विजेचा धक्का बसला होता.