
पणजी : मळा येथील चार खांब परिसरातील साकवाखालील पाण्यात पडून फ्रान्सिस वेंकय्या नेल्लाटोर (५१, चिंबल) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पणजी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला.
पणजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार ४ रोजी सकाळी फ्रान्सिस हे पणजीहून सांताक्रुझ दिशेने जात होते. त्यावेळी मळा येथील चार खांब परिसरातील साकवाजवळ पोहचताच त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि ते पाण्यात पडले. त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्याला बाहेर काढले. याच दरम्यान अपघाताची माहिती १०८ रुग्णवाहिकेला आणि पोलीस नियंत्रण कक्षाला देण्यात आली. त्यानंतर रुग्णवाहिकेतून बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात उपचारासाठी नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
दरम्यान, पणजी पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मंजुनाथ नाईक यांनी शवचिकित्सा झाल्यानंतर अनैसर्गिक मृत्यूची नोंद करून मृतदेह कुटुंबीयाच्या स्वाधीन केला.