दोनापावला, म्हापसा येथील बंगल्यांवरील दरोड्यांत सहभाग

पणजी : दोनापावला आणि म्हापसा येथील बंगल्यांवर सशस्त्र दरोडे टाकून लाखो रुपयांचा ऐवज पळवणाऱ्या बांगलादेशी टोळीतील सहावा संशयित मोहम्मद नाझीर याला बुधवारी गोव्यात आणले. त्याला पुढील पोलीस कोठडीसाठी गुरुवारी म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
दरम्यान, गुन्ह्यांनंतर गोवा पोलीस या टोळीच्या मागावर होते. दरम्यान, १४ आणि १५ एप्रिल रोजीच्या मध्यरात्री दिल्लीतील सराय काले खान स्मशानभूमीजवळील जंगलात सदर टोळी एका नवीन दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्या परिसराला वेढा घालून सहा दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या. त्यावेळी दरोडेखोरांनी पोलिसांवर गोळीबार केला होता. दिल्ली पोलिसांनी चोख प्रत्युत्तर देत सहा जणांना ताब्यात घेतले होते. पोलिसांनी बांगलादेश येथील मोहम्मद नाझीर, नूर आलम ऊर्फ नादिम खान, मो. सैफूल इस्लाम, सोहेल खान, जाकिर हवालदार आणि मो. सुमन हवालदार ऊर्फ पप्पू या सहा जणांना अटक केली होती. त्यातील मोहम्मद नाझीर याला वगळता इतर पाच जणांना गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेच्या ताब्यात दिले होते. त्यानुसार, गुन्हा शाखेने त्या पाच जणांना अटक करून कारवाई केली.
सहावा संशयित नाझीर याची कोठडी आवश्यक असल्याची माहिती देत गुन्हा शाखेने म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयाकडून हस्तांतरण वॉरंट जारी करून घेतले. त्यानुसार, गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक मंगेश वळवईकर, हवालदार जयेश तारी, कॉन्स्टेबल सुभा गावकर, स्वप्नील सिमेपुरुषकर, आयआरबीचे हवालदार गौतम फडते, काँन्स्टेबल दत्तराज घासरी, आशिष नावेलकर आणि राहुल मोर्या हे पथक रविवारी दिल्लीत रवाना करण्यात आले. त्यानुसार, सोमवारी तिथे पोहचल्यानंतर पथकाने दक्षिण दिल्ली येथील साकेत न्यायालयाकडून संशयित नाझीरची कोठडी घेतली. त्यानुसार, बुधवारी सायंकाळी त्याला गोव्यात आणले. दरम्यान, संशयित नाझीरला एका खून प्रकरणात तेथील न्यायालयीन कोठडीत ठेवले होते.
लाखो रुपयांच्या दरोड्यांत सहभाग
बांगलादेशी टोळीने २० एप्रिल २०२५ रोजी दोनापावला येथील एका बंगल्यात घरमालकांना बाथरूममध्ये कोंडून एक किलो सोने आणि ३ लाख रुपयांची लूट केली होती. त्यानंतर ७ ऑक्टोबर २०२५ रोजी म्हापसा हाऊसिंग बोर्ड परिसरात ३५ लाखांचा ऐवज लुटून तक्रारदाराची कार घेऊन ते पसार झाले होते. या दोन्ही घटनांमुळे गोव्यात खळबळ उडाली होती.