काहीच घडले नाही या अविर्भावात वावरले, बोट खारीवाडा जेटीवर नांगरली आणि थेट गाव गाठले. वास्कोत खळबळ.

वास्को : ज्या कामगारांना पोटाशी धरले, ज्यांच्या सुख-दुःखात सोबत केली, त्याच कामगारांनी मालकाचा विश्वासघात करत त्यांचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना वास्को येथील खारीवाडा परिसरात उघडकीस आली आहे. स्वभावाने अत्यंत मनमिळाऊ, शांत आणि आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक असणारे स्थानिक बोट मालक मंजुनाथ हरिकांत यांची त्यांच्याच बोटीवर काम करणाऱ्या ओडिशातील कामगारांनी हत्या केली व मृतदेह समुद्रात फेकून दिला. या फिल्मी स्टाईलने घडलेल्या थरारक घटनेमुळे संपूर्ण मच्छिमार बांधवांमध्ये भीतीसह प्रचंड संतापाचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंजुनाथ हरिकांत हे नेहमीप्रमाणे ओडिशा येथील काही कामगारांना सोबत घेऊन मासेमारीसाठी समुद्रात गेले होते. मात्र, या प्रवासादरम्यान समुद्रातच मालक आणि कामगारांमध्ये काही क्षुल्लक कारणांवरून वाद झाला. या वादाचे रूपांतर हिंसेत झाले आणि कामगारांनी एकत्र येऊन मंजुनाथ यांच्या डोक्यावर जड वस्तूने जोरदार प्रहार केला. हा हल्ला इतका भीषण होता की मंजुनाथ यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी क्रूरतेची सीमा ओलांडत संशयितांनी मंजुनाथ यांचा मृतदेह थेट समुद्रात फेकून दिला.
धक्कादायक बाब म्हणजे, यानंतर त्यांनी ती मासेमारीची बोट अत्यंत शांत डोक्याने किनाऱ्यावर आणली आणि जेटीवर नांगरून उभी केली. जणूकाही घडलेच नाही अशा अविर्भावात आपल्या बॅगा घेतल्या आणि तडक आपल्या गावी पळ काढला.
आज १ जून पासून मान्सून काळातील मासेमारी बंदी लागू झाल्याने किनाऱ्यावर अनेक बोटी उभ्या आहेत, कदाचित सुरुवातीला कोणालाही संशय आला नाही. मात्र, समुद्रात एक बेवारस मृतदेह तरंगताना आढळल्याची बातमी पसरताच स्थानिक मच्छिमारांनी सतर्कता दाखवली. तो मृतदेह मंजुनाथ यांचा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, संशयाची सुई त्यांच्या बोटीवरील बेपत्ता कामगारांकडे वळाली.
या घटनेने गोव्यातील परप्रांतीय कामगारांच्या पोलीस व्हेरिफिकेशनचा (पोलीस पडताळणी) अत्यंत गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. जर या कामगारांची नोंद पोलीस दप्तरी असती, तर आज पोलीस तात्काळ त्यांच्या मुसक्या आवळू शकले असते. सध्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर सुरू केला असून स्थानिक नागरिकांकडून अधिक माहिती गोळा केली जात आहे.