युवतीवर प्राणघातक हल्लाप्रकरणी युवकाला सशर्त जामीन मंजूर

लिव्ह-इन संबंधातून वाद : ५० हजार रुपयांचा जामीन, अटी लागू

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
02nd June, 11:46 pm
युवतीवर प्राणघातक हल्लाप्रकरणी युवकाला सशर्त जामीन मंजूर

पणजी : लिव्ह-इन संबंधातून झालेल्या वादातून जोडीदारावर प्राणघातक हल्लाप्रकरणी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने अनिर्बन चौधरी (४१) याला ५० हजार रुपये व इतर अटीवर सशर्त जामीन मंजूर केला आहे. न्या. अश्विन डी. भोबे यांनी याबाबतचा आदेश दिला.
या प्रकरणी सुमिता घोष यांनी पणजी महिला पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, १० फेब्रुवारी २०२६ रोजी 'कासा एडमरेलिया' या निवासस्थानी झालेल्या वादात संशयित अनिर्बन चौधरी याने सुमिता यांना कानशिलात मारली आणि त्यांचे डोके जमिनीवर आपटले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.या तक्रारीची दखल घेत महिला पोलिसांनी गुन्हा दाखल करून अनिर्बन चौधरी याला ७ मार्च रोजी अटक केली होती. सुरुवातीला संशयिताला पोलीस कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडीत असताना चौधरीने मेरशी येथील सत्र न्यायालयात जामीन अर्ज केला होता; मात्र तो फेटाळण्यात आल्याने त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
उच्च न्यायालयात संशयित चौधरीच्या वतीने अॅड. पराग राव यांनी युक्तिवाद मांडला. त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, घटनेच्या दिवशी पीडिता सोफ्यावर पडून जखमी झाली होती. त्यानंतर संशयितानेच तिला तातडीने दोनापावला येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. घटनेनंतर दोघेही १३ फेब्रुवारीपर्यंत एकत्र राहिले आणि १४ फेब्रुवारी रोजी त्यांनी मित्रांसोबत पार्टी देखील केली होती. असे असतानाही, पीडितेने घटनेच्या ११ दिवसांनंतर म्हणजेच २१ फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल केली. त्यानंतर ७ मार्च रोजी संशयित चौधरीला अटक केली.

न्यायालयाचे निरीक्षण
बचाव पक्षाने न्यायालयात स्पष्ट केले की, या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून, न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. प्राणघातक हल्ल्याचा आरोप वगळता संशयितावरील इतर सर्व गुन्हे जामीनपात्र आहेत. तसेच, पीडितेने दंडाधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदवताना असभ्य वर्तन करून सही करण्यास नकार दिला होता, ही बाबही न्यायालयासमोर आली. तक्रार दाखल करण्यास झालेला ११ दिवसांचा विलंब आणि पीडितेचे वर्तन यावर महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवून, न्यायालयाने संशयित अनिर्बन चौधरीचा जामीन मंजूर केला.    

हेही वाचा