सारमानस येथील घटना : ओहोटीमुळे अनर्थ टळला; दांपत्य बचावले, स्थानिक युवक, अग्निशमनकडून बचावकार्य

डिचोली : सारमानस-पिळगाव येथील फेरीधक्क्यावर एक कार फेरीधक्क्यावरून सरळ नदीपात्रात पडण्याची घटना घडली. केवळ दैव बलवत्तर म्हणून या कारमध्ये असलेल्या दोघांचा जीव वाचला. स्थानिक युवकांनी तसेच फेरीबोटवरील कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची शिकस्त करून सदर नदीपात्रात पडलेली कार बाहेर काढली. या घटनेची माहिती डिचोली अग्निशामक दलालाही देण्यात आली होती. दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन कार बाहेर काढण्यात सहकार्य केले.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री ७.१५ वा. सांतइस्तेव येथून फेरीबोटमधून सारमानस येथे फेरीधक्क्यावर दाखल झालेली जीए ०३ व्हाय ६१२८ ही मारूती स्विफ्ट कार सदर कारचालकाने रिव्हर्स गिअरमध्ये फेरीमधून फेरीधक्क्यावर आणली. रिव्हर्समध्येच कारचे तोंड वरच्या बाजूला म्हणजेच सारमानसच्या दिशेने करून गाडी पुढे नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या चालकाकडून चुकून कारचे पुढे जाण्याचे गिअर घालण्याचे राहून गेले, त्यामुळे कारचा एक्सलेटर दाबताच कार वेगाने मागील रस्त्याच्या बाजूला असलेल्या कठड्यावरून थेट नदीपत्रात पडली. सुदैवाने यावेळी नदीला ओहोटी होती. त्यामुळे नदीकिनारी भागात जास्त पाणी नव्हते व कार नदीच्या किनारी असलेल्या सुक्याच भागावर स्थिरावली.
ही घटना घडतात एकच गोंधळ उडाला. लागलीच सर्वांना येथील स्थानिक युवकांनी तसेच फेरीबोटीवरील कर्मचाऱ्यांनी सदर कार बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. नदीपात्रात चिखल असल्याने त्या भागात दगड तसेच जवळच असलेल्या मानसीवरील लाकडाच्या फळ्या घालून सदर कार फेरीधक्क्यावरूनच बाहेर काढण्यात आली. फेरीबोटवरील एका कर्मचाऱ्यांनेच स्वतः कार चालवत बाहेर काढली. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनीही कार नदीबाहेर काढण्यात स्थानिकांना सहकार्य केले.
घटना घडताच सारमानस येथील निखिल वरगावकर, प्रसाद वरगावकर, विनोद वळवईकर, अलंकार म्हार्दोळकर, बाबलो आरोसकर, संदीप वरगावकर व इतर युवकांनी या घटनेनंतर लागलीच गाडी बाहेर काढण्यासाठी मदतकार्य केले.
या घटनेत कारचे मोठे नुकसान झाले नाही, तसेच ओहोटी असल्याकारणाने कारमधील दोघांनाही कोणताही धोका निर्माण झाला नाही. सुदैवाने यावेळी सदर ठिकाणी कोणतीही दुचाकी किंवा प्रवासी उभा नसल्याने मोठा अनर्थ टळला. सदर कारमध्ये शिरदोन येथील वासुदेव कुंकळकर व तेजा वासुदेव कुंकळकर हे दांपत्य होते.
फेरीधक्का धोकादायक
सारमानस पिळगाव येथील हा फेरीधक्का आतापर्यंत धोकादायकच ठरला आहे. आजपर्यंत अनेक कार अंदाज चुकल्याने या धक्क्यावरून थेट पाण्यात गेलेल्या आहेत. त्यात काही जणांना जीवही गमवावा लागला आहे. हल्लीच अशाच प्रकारे एक कार फेरीबोटमधून बाहेर काढल्यानंतर गिअर लॉक झाल्याने थेट फेरी धक्क्याच्या बाजूने पाण्यात गेली होती. सुदैवाने घटनास्थळी उपस्थित लोकांच्या मदतीने कारमधील व्यक्ती बाहेर पडले होते व मोठा अनर्थ टळला होता. तीन वर्षांपूर्वी असाच एक कार चालक फेरीबोटच्या प्रतीक्षेत राहिला असता ताबा सुटून कार थेट पाण्यात गेली होती. या घटनेत सदर कार चालकाला मृत्यू आला होता. अशा अनेक घटना या फेरीधक्क्यावर घडलेल्या आहेत.