फातोर्डा पोलिसांकडून चौघांविरुद्ध गुन्हा नोंद

मडगाव : फातोर्डा येथील बोर्डा भागात कारचा पाठलाग करून, ती अडवून त्यातील अल्पवयीन मुलाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी फातोर्डा पोलिसांनी चार संशयित युवकांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
याप्रकरणी अनारकली नदाफ (३९, रा. ताळसांझोर, बोर्डा, फातोर्डा) यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित मयुराज सुभाष म्हामल (रा. सुरावली), जॉयरीयल आग्नेल लुईस (२६, रा. कुडतरी), नेस्लीनो मारिओ दा सिल्व्हा (२७, रा. माडेल, कुडतरी) व मालरीझ काजिया रॉड्रिग्ज (२३, रा. कुडतरी) अशी संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २ जून रोजी पहाटे १.५० वाजण्याच्या सुमारास बोर्डा, फातोर्डा येथील एका ब्युटी पार्लरजवळ घडली. तक्रारदार महिला आपल्या स्विफ्ट कारने जात असताना, दोन दुचाकींवरून आलेल्या चार संशयितांनी त्यांच्या कारचा पाठलाग केला. संशयितांनी कारला जबरदस्तीने रस्त्यात अडवले. त्यानंतर कारमधील लोकांना शिवीगाळ करत संशयितांनी कारच्या चालकाच्या बाजूची काच फोडली. एवढ्यावरच न थांबता संशयितांनी तक्रारदार महिलेच्या अल्पवयीन मुलाला कारमधून ओढून बाहेर काढले आणि त्याला लाथाबुक्क्यांनी व कानशिलात मारून जखमी केले. तसेच मारहाण केल्यानंतर पीडिताला जीवे मारण्याची धमकीही दिली. याप्रकरणी फातोर्डा पोलिसांनी चार ही संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि गोवा बाल संरक्षण कायदा यांच्या अन्वये गुन्हा दाखल केला आहे. फातोर्डा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.