दारूच्या नशेत ट्रकचालकाकडून दुचाकीला धडक

होंडा-सोनशी मार्गावरील अपघातात तिघेजण जखमी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
03rd June, 11:42 pm
दारूच्या नशेत ट्रकचालकाकडून दुचाकीला धडक

वाळपई : होंडा-सोनशी मार्गावरील आजोबा मंदिराजवळ बुधवारी सायंकाळी एक भीषण अपघात घडला. दारूच्या नशेत बेफामपणे ट्रक चालवणाऱ्या एका चालकाने समोरून येणाऱ्या प्लेझर दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील पती, पत्नी आणि मुलगी गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती की, दुचाकीला धडक दिल्यानंतर ट्रक झाडावर आदळून रस्त्याच्या कडेला कलंडला आणि त्याची चाके निखळून पडली.
अपघातात जखमी झालेल्या दुचाकीवरील कुटुंबाला आणि जखमी ट्रकचालकाला स्थानिकांच्या मदतीने तातडीने १०८ रुग्णवाहिकेद्वारे साखळी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना तत्काळ बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेजमध्ये (गोमेकॉ) हलवण्यात आले आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित ट्रकचालक (जीए ०१ यू ७०७८) होंडा बाजारातूनच अत्यंत बेशिस्तपणे वाहन चालवत होता. धक्कादायक बाब म्हणजे, एवढा मोठा अपघात घडवूनही हा चालक ट्रकच्या केबिनमधून बाहेर पडला आणि तिथेच शांतपणे झोपून राहिला. त्याच्या या अजब कारभारामुळे तो पूर्णपणे नशेत असल्याचे स्पष्ट झाले असून, घटनास्थळी जमा झालेल्या नागरिकांनी त्याच्या या कृत्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच होंडा पोलीस चौकीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली असून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.‍‍
वाढत्या वेगामुळे अपघात सत्रात वाढ
होंडा-सोनशी हा मार्ग प्रामुख्याने खनिज वाहतुकीसाठी वापरला जातो. नुकतेच या मार्गाचे हॉटमिक्स डांबरीकरण आणि रुंदीकरण झाल्यामुळे अनेक वाहनचालक येथे वाहने बेफाम वेगाने पळवत असतात. गेल्या चार महिन्यांत याच परिसरात तीन मोठे अपघात घडल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.

हेही वाचा