हरमल येथे मोबाईल शॉपीला शॉर्टसर्किटने आग

मोबाईल भस्मसात, लाखोंचे नुकसान

Story: वार्ताहर। गोवन वार्ता |
05th June, 11:55 pm
हरमल येथे मोबाईल शॉपीला शॉर्टसर्किटने आग

हरमल : तिठा येथील ओम मोबाईल शॉपीला शॉर्टसर्किटने आग लागून मोबाईल, बॅटरी व अन्य साधने भस्मसात झाले. आगीमुळे सुमारे तीन लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

दि. ४ रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास हरमल तिठा येथे सहदेव गवस हे ओम मोबाईल शॉप बंद करून गेल्यानंतर अवघ्या तासाभरात दुकानातून धूर येऊ लागला. आग लागल्याचे लक्षात येताच नजीकच्या दुकानदारांनी दुकान व इमारत मालकास संपर्क साधला. पेडणे अग्निशमन दलाशीही संपर्क साधण्यात आला. तत्पूर्वी स्थानिक नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. शॉपमधील दुरुस्तीसाठी असलेले मोबाईल व अन्य साधने भस्मसात पडली होती.

दरम्यान, स्थानिकांनी आग विझवल्यानंतर, तब्बल एका तासाने अग्निशमन दलाची गाडी पोचली. तोपर्यंत दुकानातील सर्व माल आगीत भस्मसात झाला होता.

अग्निशमन दलाचे सब ऑफिसर सुनील देसाई, लीडिंग फायर फायटर विकास चव्हाण, फायर फायटर धनंजय वस्त, फायर फायटर नीतेश शेट्ये, फायर फायटर मयूर नाईक, जयराम कानोळकर व ड्रायव्हर शैलेश हळदणकर आदींनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांनी आग विझवण्यात मोलाची कामगिरी बजावली.

दरम्यान, मोबाईल शॉप मालक सहदेव गवस हे मूळ वेंगुर्ला येथील आहेत. दुकानात १०० पेक्षा जास्त मोबाईल दुरुस्तीसाठी होते. सर्व मोबाईल आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असल्याचे गावस यांनी सांगितले. दुकानाचा विमा नव्हता असे समजते. आग लागल्याचे समजताच दोघेजण मोबाईल नेण्यासाठी आले असता, त्यांना दुःख अनावर झाले होते. 

हेही वाचा