बनावट एनओसी प्रकरण : कांदोळी आरोग्य केंद्राकडून तक्रार दाखल

म्हापसा : हडफडे येथील बर्च क्लब आग दुर्घटनेत निष्पाप २५ जणांचा मृत्यू झाला होता. या ‘बर्च बाय रोमियो लेन’ या नाईट क्लबला उत्पादन शुल्क परवाना मिळवण्यासाठी कांदोळी आरोग्य केंद्राचा बनावट ना हरकत दाखला तयार करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित अबकारी खात्याचे वरिष्ठ कारकून गौरेश गावस यांचा अटकपूर्व जामीन अर्ज म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयाने मंजूर केला आहे.
हा गुन्हा बर्च बाय रोमिओ लेन तथा जीएस हॉस्पिलिटी एलएलपीच्या अधिकृत व्यक्तीविरुद्ध नोंदवला आहे. तर अर्जदार हा उत्पादन शुल्क खात्यात वरिष्ठ लिपिक म्हणून सेवेत आहे. उत्पादन शुल्क परवान्यासाठी आलेल्या अर्जांवर प्रक्रिया करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे स्वीकारणे व ती उत्पादन शुल्क पोर्टलवर अपलोड करणे, हे त्याचे काम आहे.
अर्जदाराने बनावट कागदपत्रांच्या आधारे उत्पादन शुल्क परवाना दिला. मात्र स्वत: ती कागदपत्रे बनावट केली किंवा त्या बनावट कागदपत्रांच्या निर्मात्याशी संगनमत केल्याचे पोलिसांनी म्हटलेले नाही, असे निरीक्षण न्यायाधीश द्विजपल पाटकर यांनी हा या निवाड्यामध्ये नोंदवले आहे.
अर्जदाराला अटक करण्याची वेळ आल्यास २५ हजारांची हमी रक्कम आणि तितक्याच रकमेच्या हमीदाराच्या हमीसह न्यायालयाने लागू केलेल्या अटीनुसार त्याची जामिनावर सुटका करण्यात यावी, असे निर्देशही न्यायालयाने म्हापसा पोलिसांना दिले आहेत. न्यायालयात अर्जदाराच्यावतीने अॅड. एम. नाझारेथ यांनी तर सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील जेनिफर सांतामारीया यांनी युक्तीवाद केला.
दरम्यान, बर्च क्लबमध्ये दारू विक्रीसाठी उत्पादन शुल्क परवाना मिळवण्यासाठी कांदोळी आरोग्य केंद्राची बनावट एनओसी तयार करून नंतर सदर दाखला अबकारी खात्याच्या म्हापसा कार्यालयात सादर करण्यात आला होता. त्यानुसार अबकारी खात्याने बर्च बाय रोमिओ लेन क्लबला मद्यविक्रीचा परवाना दिला होता.
बर्च क्लब आग दुर्घटनेच्या चौकशीवेळी हणजूण पोलिसांच्या निदर्शनास हा प्रकार आला होता. त्यानंतर कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. रोशन नाझारेथ यांनी म्हापसा पोलिसांत दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. हा प्रकार १३ डिसेंबरपूर्वी अबकारी खात्याच्या म्हापसा निरीक्षक कार्यालयात घडला होता.
अजय गुप्ता, लुथरा बंधूंना यापूर्वीच जामीन
बर्च बाय रोमिओ लेन क्लबला अबकारी उत्पादन शुल्क परवाना मिळवण्यासाठी कांदोळी आरोग्य केंद्राचा बनावट ना हरकत दाखला तयार करण्यात आला. या प्रकरणात म्हापसा पोलिसांनी अटक केलेले क्लबचे मालक अजय गुप्ता यांची ७ फेब्रुवारी तर गौरव लुथरा व सौरभ लुथरा यांना ८ एप्रिल रोजी न्यायालयाने जामिनावर सुटक केली होती.