आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवा

सॅम्युअलच्या आईची पोलीस अधीक्षकांकडे मागणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
06th June, 09:47 pm
आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवा

मानसिक तणावातून आत्महत्या केलेल्या २२ वर्षीय सॅम्युअल गार्विन दी ब्रागांझा याच्यावर गुन्हा नोंद केलेले संबंधित पोलीस अधिकारी आणि व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार मृताच्या आईने उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.

कारवाई होईपर्यंत अंत्यसंस्कारास नकार

दोषींवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंतिम संस्कार करणार नाही, असा ठाम पवित्रा कुटुंबाने घेतला आहे. त्यामुळे सॅम्युअलचा मृतदेह सध्या गोवा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे.

पोलिसांवर मानसिक छळाचे आरोप

पोलिसांनी मुलाची दुचाकी जप्त केली तसेच त्याला पोलीस स्थानकातील विविध खोल्यांमध्ये नेऊन वारंवार मानसिक त्रास दिला, असा आरोप त्याच्या आईने केला आहे. पोलीस स्थानकात हजर न झाल्यास अटक करू तसेच भविष्यात नोकरी किंवा परदेशात जाण्याची संधी मिळणार नाही, अशी धमकी देऊन त्याला रात्री पायीच घरी पाठवण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

सोशल मीडियावरील व्हिडिओमुळे धक्का?

पोलिसांनी दुचाकी जप्त केल्यानंतर काही सोशल मीडिया चॅनेल्सनी सॅम्युअलची वैयक्तिक माहिती जाहीर करून त्याचे चारित्र्यहनन केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या सर्व घटनांमुळे झालेल्या मानसिक धक्क्यातून त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तपास दुसऱ्या पोलीस स्थानकाकडे देण्याची मागणी

संबंधित पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांच्यावर कठोर कारवाई करावी. तसेच या अधिकाऱ्यांसह व्हिडिओ बनवणारी व्यक्ती आणि इतर संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंद करून या प्रकरणाचा तपास दुसऱ्या पोलीस स्थानकाकडे सोपवावा, अशी मागणी मृताच्या आईने तक्रारीत केली आहे.

देशी कट्टा जप्त; तपास सुरू

सॅम्युअलने ज्या देशी कट्ट्याने स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवले, ते पिस्तूल म्हापसा पोलिसांनी जप्त केले आहे. हा कट्टा उत्तर प्रदेश किंवा बिहारमधून आणला असावा, असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला असून त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा