गोमेकॉचे डॉ. अमित डायस जगातील उत्कृष्ट ५ टक्के शास्त्रज्ञांच्या यादीत

आरोग्य संशोधनातील योगदानाची जागतिक दखल

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
06th June, 09:49 pm
गोमेकॉचे डॉ. अमित डायस जगातील उत्कृष्ट ५ टक्के शास्त्रज्ञांच्या यादीत

गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या (गोमेकॉ) प्रतिबंधात्मक आणि सामाजिक औषधवैद्यक विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. अमित डायस यांना ‘२०२५ सायरँक ग्लोबल रजिस्ट्री’मध्ये जगातील पहिल्या ५ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान मिळाले आहे. वैज्ञानिक उत्पादकता आणि संशोधनाच्या प्रभावाच्या स्वतंत्र जागतिक विश्लेषणातून त्यांची या प्रतिष्ठित यादीत जागतिक क्रमवारी १,६१,२०९ वर निवड करण्यात आली आहे.

जागतिक संशोधन क्षेत्रातील मानाचा बहुमान

सायरँक ग्लोबल २०२५ सायंटिस्ट इंडेक्स हा जगभरातील सुमारे १ कोटी सक्रिय संशोधक आणि ५ कोटीहून अधिक शैक्षणिक संशोधन प्रकाशनांच्या सर्वसमावेशक मूल्यांकनावर आधारित आहे. या जागतिक यादीत डॉ. अमित डायस यांचा झालेला समावेश हा त्यांच्या वैयक्तिक यशाचा गौरव तर आहेच, शिवाय गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि गोव्याच्या जागतिक आरोग्य संशोधनातील वाढत्या योगदानाचीही नोंद घेणारा आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक वाटचाल

डॉ. डायस यांनी लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिन आणि युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथून एमडी (प्रतिबंधात्मक आणि सामाजिक औषधवैद्यक), ट्रॉपिकल मेडिसिन अँड हायजीन पदविका, जेरियाट्रिक मेडिसिनमधील पदव्युत्तर पदविका तसेच क्लिनिकल ट्रायल्समध्ये एमएससी ही उच्च शिक्षणे पूर्ण केली आहेत.

डिमेंशिया आणि सार्वजनिक आरोग्य संशोधनातील योगदान

डिमेंशिया (स्मृतिभ्रंश), निरोगी वृद्धत्व, मानसिक आरोग्य, मधुमेह आणि इतर महत्त्वाच्या सार्वजनिक आरोग्य विषयांवरील संशोधनासाठी डॉ. अमित डायस यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे. त्यांच्या संशोधनाचा उपयोग आरोग्य धोरणे आणि वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासासाठी महत्त्वाचा मानला जातो.

डॉ. अमित डायस यांनी मानले आभार

गोव्यातील लोकांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल राज्य सरकार आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे आपण आभारी असल्याचे डॉ. डायस यांनी सांगितले. तसेच गोमेकॉ प्रशासन, माजी डीन डॉ. सी. पी. दास, डॉ. व्ही. एन. जिंदाल आणि माजी शिक्षक प्राध्यापक डी. डी. मोटघरे यांच्या पाठिंब्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. पत्नी डॉ. लिडिया यांच्या खंबीर साथीशिवाय हा प्रवास शक्य झाला नसता, असेही त्यांनी नमूद केले.

"हे यश केवळ माझे नसून गोमेकॉ, माझे सहकारी, शिक्षक, कुटुंबीय आणि गोव्याच्या आरोग्य क्षेत्राचे आहे. संशोधनाच्या माध्यमातून समाजासाठी योगदान देत राहणे हीच पुढील वाटचाल असेल."