दोघा वकिलांसह आठ जणांवर फातोर्डात गुन्हा

बनावट सह्यांद्वारे मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न भोवला


07th June, 10:32 pm
दोघा वकिलांसह आठ जणांवर फातोर्डात गुन्हा

प्रतिनिधी। गोवन वार्ता

मडगाव : मालमत्तेची बनावट कागदपत्रे तयार करून मृत व्यक्तीची वडिलोपार्जित मालमत्ता हडपण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी फातोर्डा पोलिसांनी दोघा वकिलांसह आठ जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
बनावट कागदपत्रांद्वारे मालमत्ता विक्री झाल्याची तक्रार रॉयसन डिकॉस्टा आणि गॅली दिनिज (रा. माजोर्डा) यांनी फातोर्डा पोलिसांत दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालमत्ता हडपण्याची ही घटना २१ मे ते १६ ऑगस्ट २०२२ या कालावधीत झाली होती. संशयित ओयलॉन रॉबिन दिनिज, मेलिसा फर्नांडिस, फ्रान्सिस फर्नांडिस, अ‍ॅड. संतोष नाईक, अ‍ॅड. वीरेंद्रकुमार देसाई, क्रूझ फर्नांडिस, फ्रान्सिका फर्नांडिस आणि रती फर्नांडिस यांनी हा प्रकार केला. संशयितांनी संगनमत करून मृत जॉन बाप्तिस्त यांच्या नावावरील मालमत्ता आपल्या नावे करण्याचा प्रकार केला. यातील संशयित ओयलॉन आणि मेलिसा हे लंडनमध्ये असतानाही, त्यांनी बनावट स्वाक्षर्‍यांचा वापर करून मडगाव येथील मामलेदार कार्यालयातील भू नोंदीत स्वतःची नावे समाविष्ट करून घेतली.
परदेशातील संशयित हजर असल्याचे भासवले
विशेष म्हणजे, या जमिनीवर नावांची नोंद करण्याच्या प्रकरणात संशयित वकिलांनी प्रतिज्ञापत्रे तयार केली. त्यांनी परदेशात असलेला संशयित ओयलॉन दिनिज प्रत्यक्ष मामलेदार कार्यालयात हजर असल्याचे भासवले होते. तक्रारीनंतर पोलिसांनी अ‍ॅड. संतोष नाईक व अ‍ॅड. वीरेंद्रकुमार देसाई यांच्यासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. फातोर्डा पोलीस निरीक्षक राहुल नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामराय नाईक तपास करत आहेत.                   

हेही वाचा