गुन्हेगारी पार्श्वभूमी, जामिनानंतर पलायनाच्या शक्यतेने टारझन पार्सेकरला जामीन नाकारला

नागवा येथे रवी शिरोडकर यांच्यावर केला होता हल्ला

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
07th June, 11:07 pm
गुन्हेगारी पार्श्वभूमी, जामिनानंतर पलायनाच्या शक्यतेने टारझन पार्सेकरला जामीन नाकारला

पणजी : सराईत गुन्हेगार टारझन पार्सेकर याने केलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा असून त्यासाठी त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून एका खुनी हल्ला प्रकरणात त्याला दोषी ठरवण्यात आले आहे. याशिवाय त्याची मागील वर्तणुकीचा विचार केला असता, तो जामीन मिळाल्यानंतर फरार झाला होता, असे निरीक्षण नोंदवून म्हापसा येथील जलदगती न्यायालयाने टारझन पार्सेकर याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. याबाबतचा आदेश अतिरिक्त न्या. रैना फर्नांडिस यांनी दिला.

हणजूण पोलिसांनी २०२२ मध्ये गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार, टारझन पार्सेकर व इतरांनी नागवा येथे रवी शिरोडकर (कळंगुट) याच्यावर १ ऑक्टोबर २०२२ रोजी खुनी हल्ला केला होता. या प्रकरणी हणजूण पोलिसांनी मुख्य संशयित टारझन आणि सागर उर्फ क्षेत्रपाल संतोष पाटील यांच्यासह इतरांविरोधात गुन्हा दाखल करून त्या दोघांना अटक केली होती. नंतर त्या दोघांनी पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. तो फेटाळण्यात आल्यानंतर त्या दोघांनी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात जामीन दाखल केला असता, त्या दोघांना उत्तर गोव्यात प्रवेश करण्यास मनाई करत ८ आॅगस्ट २०२३ रोजी सशर्त जामिनावर सुटका केली होती. असे असताना टारझन पार्सेकर याने ४ जानेवारी २०२४ रोजी नागवा येथे एका व्यक्तीला व त्याच्या ९ वर्षीय मुलाला मारहाण केली होती. या प्रकरणी हणजूण पोलिसांनी पार्सेकरसह सागर उर्फ क्षेत्रपाल संतोष पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी बाल न्यायालयाने टारझन याला सशर्त जामीन मंजूर केला.

दरम्यान, वरील प्रकरणात हणजूण पोलिसांनी टारझन याचा जामीन रद्द करण्याची मागणी न्यायालयात केली. त्यानुसार, न्यायालयाने १२ मार्च २०२४ रोजी त्याचा जामीन रद्द केला. त्यानंतर २२ जून २०२५ रोजी पोलिसांनी पुन्हा अटक केली.

५६ साक्षीदारांची होणार उलटतपासणी

वरील प्रकरणी ५६ साक्षीदारांची उलटतपासणी होणार आहे. त्यामुळे खटला समाप्त होण्यास विलंब होणार आहे. असा दावा करून टारझन पार्सेकर याने जामीन अर्ज दाखल केला. या प्रकरणी संशयित टारझन सराईत गुन्हेगार आहे. तसेच वरील निरीक्षण नोंदवून न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला. 

हेही वाचा