पिस्तुलाच्या गोळीमुळेच मृत्यू : शवचिकित्सा अहवालातून स्पष्ट

म्हापसा : गावसावाडा-म्हापसा येथील सॅम्युअल गार्विन दी ब्रागांझा या २२ वर्षीय युवकाचा मृत्यू हा पिस्तुलाची गोळी लागल्याने मेंदूला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे झाल्याचे शवचिकित्सा अहवालातून स्पष्ट झाले आहे. तसेच त्याच्या उजव्या डोळ्याच्या खोबणीचे हाड मोडले असल्याचे गोवा वैद्यकीय इस्पितळाच्या फॉरेन्सिक तज्ज्ञांनी अहवालात नमूद केल्याने त्याच्या डोळ्यावर हा आघात कसा झाला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सॅम्युअल याच्या डोळ्याला ही गंभीर दुखापत त्याच्या मृत्यूच्या २४ तासापूर्वी झाली होती. पिस्तुलातून झाडलेली गोळी लागण्याव्यतिरिक्त सॅम्युअलच्या उजव्या डोळ्याभोवती बोथट वस्तूने जोरदार प्रहार करण्यात आला होता. या प्रहारामुळे त्याच्या डोळ्याभोवती मोठी सूज आली. याला वैद्यकीय भाषेत ‘ब्लॅक आय’ म्हणतात. त्याच्या डोळ्याच्या खोबणीचे हाड आतून तुटल्याचे शवचिकित्सा अहवालातून उघडकीस आले आहे.
शवचिकित्सा अहवालानुसार, सॅम्युअलवर पिस्तुलातून अगदी जवळून गोळी झाडण्यात आली, ज्याची जखम कवटीच्या मधोमध स्पष्टपणे दिसत आहे. त्याच्या उजव्या कानशिलावरून ही गोळी आत घुसली. अत्यंत जवळून गोळी झाडल्यामुळे जखमेच्या अवतीभवती काळे डाग, जळाल्याच्या खुणा आणि केस जळाले असल्याचे आढळले. उजव्या बाजूने घुसलेली ही गोळी सॅम्युअलच्या मेंदूला पूर्णपणे छिन्नविछिन्न करत डाव्या बाजूला गेली आणि डाव्या बाजूच्या कवटीच्या हाडामध्ये अडकली. मृतदेहात फॉरेन्सिक पथकाला सापडलेली ही धातूची गोळी पुढील बॅलिस्टिक तपासासाठी जप्त करण्यात आली आहे.
आत्महत्या प्रकरणाला वेगळा अँगल
सुरुवातीला हे मृत्यू प्रकरण सरळसरळ आत्महत्या असल्याच्या दृष्टीकोनातून पाहिले जात होते. मात्र, शवचिकित्सा अहवालात सॅम्युअलच्या मृत्यूपूर्वी डोळ्याला गंभीर जखम असल्याचा खुलासा करण्यात आला आहे. त्यामुळे या आत्महत्या प्रकरणाला वेगळा अँगल मिळाला असून म्हापसा पोलिसांसमोर या मागचे कारण शोधून काढण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.