उपद्रवात वाढ : प्रतिबंधात्मक कारवाईची स्थानिकांकडून मागणी

मुरगाव पालिका इमारतीसमोरच्या पदपथावर मच्छरदाणी लावून झोपलेले बेवारसी.
वास्को : येथील मुरगाव पालिकेच्या प्रशासकीय इमारतीसमोरच्या पदपथांवर झोपणारे, आरडाओरडा करणारे, संपूर्ण पदपथ आपल्या ताब्यात घेऊन त्याची दुर्दशा करणारे बेघर लोक चर्चेचा विषय झाला आहे. त्यांच्यावर स्थानिक प्रशासन कारवाई का करीत नाही किंवा त्यांची सोय इतरत्र का करीत नाही, असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. भविष्यात असे चित्र संपूर्ण वास्कोतील पदपथावर दिसले तर आश्चर्य वाटू नये, असे माजी नगराध्यक्ष शेखर खडपकर यांनी सांगितले.
सदर बेघर लोक पूर्वी मुरगाव पालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या व्हरांड्यामध्ये झोपत होते. त्यामुळे पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. तत्कालीन मुरगाव मामलेदार कार्यालयातील कर्मचारीही बेघर लोकांनी केलेल्या गलिच्छपणामुळे वैतागले होते. तथापी मुरगाव पालिका प्रशासकीय इमारतीची दुरुस्ती व नूतनीकरण करताना त्या व्हरांड्याला सर्व बाजूंनी ग्रिल्स लावण्यात आल्याने बेघर लोकांचे आत झोपणे, बसणे, उठणे बंद झाले होते. त्यानंतर त्यांनी समोरच्या पदपथावरच ठाण मांडली. पावसाळ्यात ते कोठेतरी आडोसा घेतात. परंतु, पावसाळा संपल्यावर ते पदपथावर आपला संसार मांडतात. तेथेच अांघोळ करणे, कपडे वाळत घालणे, तेथेच चहा करणे, सगळीकडे घाण करणे वगैरे गोष्टी ते करतात.
या बेघर लोकांना सामाजिक संस्था सकाळी नाश्ता, दुपारी-रात्री जेवण देतात. त्यामुळे त्यापैकी बरेचजण काहीच कामधंदा न करता दिवसभर त्या पदपथावर बसलेले, झोपलेले आढळतात. तेथे काही वेळा मद्यपान करून शिवीगाळ करणे, मारामाऱ्या करणे वगैरे गोष्टी होतात.
यापूर्वी तत्कालीन उपनगराध्यक्ष श्रद्धा महाले यांनी पुढाकार घेऊन येथील आजारी आणि बेघर व्यक्तींना शोधून त्यांची रवानगी अनाथाश्रमात केली होती. त्या कारवाईमुळे काही काळ हा परिसर बेघर लोकांपासून मुक्त झाला होता. परंतु, प्रशासकीय सातत्य न राहिल्यामुळे काही दिवसांनंतर या बेवारस लोकांनी पुन्हा एकदा या पदपथावर आपले बस्तान मांडले, जे अद्यापही कायम आहे.
स्थानिक प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष
स्थानिक नागरिकांनी या त्रासाबाबत अनेकदा प्रशासनाकडे तोंडी व लेखी स्वरूपात गाऱ्हाणी मांडली आहेत. मात्र, तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ज्या मुरगाव पालिकेच्या इमारतीसमोर हा सर्व प्रकार सुरू आहे, त्या मुरगाव पालिका, वास्को पोलीस ठाणे तसेच संबंधित स्थानिक प्रशासकीय अधिकारी यांचे या गंभीर समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.