साप्ताहिकी - या आठवड्यात घडलेल्या ठळक घडामोडी

म्हापसा येथे बदनामीच्या तणावातून युवकाची आत्महत्या, तर शिरगावात गोळीबाराच्या घटनेने तणाव

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
06th June, 08:53 pm
साप्ताहिकी - या आठवड्यात घडलेल्या ठळक घडामोडी

पणजी : आगशी पोलिसांनी मासेमारी बोटमालक मंजुनाथ हरीकांत यांच्या खून प्रकरणाचा वेगाने तपास करत दोघा संशयितांना नागपूर रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले.म्हापसा येथे बदनामीच्या तणावातून युवकाने स्वत:वर पिस्तुलातून गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. कौटुंबिक वादातू्न उपेंद्र गावकर व त्यांच्या पत्नीवर गोळीबार करण्यात आला. मात्र, दोघांनीही सतर्कता बाळगल्याने दोघेही वाचले. याशिवाय अपघाती मृत्यू, चोरीच्या घटना घडल्या आहेत. या आठवड्यातील घडामोडींचा घेतलेला आढावा.

रविवार 

रेवोडा येथे गव्याच्या हल्ल्यात महिला जखमी

मानशेर-रेवोडा येथे गव्याच्या हल्ल्यात सिंथिया फर्नांडिस (४५) या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर म्हापसा जिल्हा इस्पितळात उपचार सुरू आहेत.सिंथिया त्यांच्या पाळीव कुत्र्याला घराबाहेर घेऊन आल्या होत्या. त्यावेळी अचानक मागून त्यांच्यावर गव्याने हल्ला केला.

कांपाल येथील अपघातात जखमी झालेल्याचा उपचारादरम्यान मृत्यू

कांपाल येथील मिलिटरी हॉस्पिटलजवळील इनर लेन रस्त्यावर गुरुवारी सकाळी झालेल्या एका कार-दुचाकी अपघातातील गंभीर जखमी दुचाकीचालक संगीतकार फाउस्तो रॉड्रिग्ज (वय ६०, रा. मिरामार) यांचे उपचारादरम्यान निधन झाले. या अपघातात त्यांच्या पत्नी मारिया रॉड्रिग्ज (वय ५५) या देखील गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

थारने धडक दिल्याने महिलेचा मृत्यू; चालकाविरोधात गुन्हा

आल्त-मांगोरहिल येथील ला-रोझ इमारतीसमारे शनिवारी थार जीपने ठोकरल्याने सासमोळे बायणा येथील गेनादेवी जैस्वाल ही मृत पावली. वास्को पोलिसांनी या अपघातप्रकरणी पंचनामा केला. बेदरकारपणे व निष्काळजीपणे वाहन हाकून गेनादेवीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या थारचालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला.

सोमवार 

हणजूण येथील हॉटेल वेस्टिन गोवाची मालमत्ता तात्पुरती जप्त

छत्तीसगड राज्यातील २,८८३ कोटी रुपयांच्या दारू घोटाळ्याचे धागेदोरे आता गोव्यापर्यंत पोहचले आहेत. त्यानुसार, सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रायपूर विभागाने मोठी कारवाई करत गोव्यातील हणजूण येथील हॉटेल ‘वेस्टिन गोवा’ तात्पुरते जप्त केले. सदर हॉटेल खरेदी करण्यासाठी वरील घोटाळ्यातील ११० कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचे समोर आले आहे.

बोणबाग-बेतोडा येथे सुसाट कारची दुसऱ्या कारला धडक

बोणबाग-बेतोडा येथील धोकादायक वळणावर एका सुसाट कारने दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुसऱ्या कारला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एक कार चालक आणि एक युवती जखमी झाली आहे.

वास्कोत कामगारांकडूनच बोट मालकाचा निर्घृण खून

वास्को येथील खारीवाडा परिसरात बोट मालकाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली. स्थानिक बोट मालक मंजुनाथ हरिकांत यांची त्यांच्याच बोटीवर काम करणाऱ्या ओडिशामधील कामगारांनी समुद्रात हत्या केली आणि मृतदेह पाण्यात फेकून दिला. या थरारक घटनेमुळे संपूर्ण मच्छिमार बांधवांमध्ये भीतीसह प्रचंड संतापाचे वातावरण पसरले आहे.

मंगळवार 


मायकल लोबो यांच्या ‘नाझरी रिसॉर्ट’वर हातोडा

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आमदार मायकल लोबो यांच्या मालकीच्या ‘नाझरी रिसॉर्ट’चे बेकायदा बांधकाम पाडण्यास मंगळवारी सुरुवात झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई उच्च न्यायालयात दिलेल्या हमीप्रमाणे ही कारवाई सुरू झाली आहे.

महिलेवरील अत्याचारप्रकरणी युवकाचा १० वर्षांचा कारावास रद्द

मुंबई उच्च न्यायालयाने रिसॉर्टच्या मालकिणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणात मिझोरम येथील कर्मचाऱ्याचा १० वर्षांचा कारावास रद्द केला. तसेच संशयिताची निर्दोष सुटका केली. याबाबतचा आदेश न्या. आशिष चव्हाण यांनी दिला.

कार अडवून अल्पवयीन मुलाला मारहाण

फातोर्डा येथील बोर्डा भागात कारचा पाठलाग करून, ती अडवून त्यातील अल्पवयीन मुलाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी फातोर्डा पोलिसांनी चार संशयित युवकांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

बुधवार

तीन दुचाकींच्या अपघातात महिलेचा मृत्यू

बायंगिणी-जुने गोवा येथे तीन दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात निलिमा साष्टे (४९) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी जुने गोवा पोलिसांनी अॅक्टिवा चालक उमाशंकर चव्हाण (४८, मूळ उत्तरप्रदेश) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मंगळसूत्र हिसकावून पळणारे दोघे ताब्यात

ओल्ड गोवा येथे एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळून जाणाऱ्या दोघा चोरांना फोंडा पोलिसांनी ‘फिल्मी स्टाईल’ने पाठलाग करून ताब्यात घेतले. ओल्ड गोवा पोलिसांनी त्वरित फोंडा पोलिसांना माहिती दिल्यानंतर तिस्क-उसगाव येथे गस्तीवर असलेल्या साहाय्यक उपनिरीक्षक लक्ष्मीकांत नाईक, सिद्धेश गावस व पोलीस शिपाई साईश मांद्रेकर या पोलीस कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. त्यानंतर चोरांना ओल्ड- गोवा पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले.


दारूच्या नशेत ट्रकचालकाकडून दुचाकीला धडक

होंडा-सोनशी मार्गावरील आजोबा मंदिराजवळ बुधवारी सायंकाळी एक भीषण अपघात घडला. दारूच्या नशेत बेफामपणे ट्रक चालवणाऱ्या एका चालकाने समोरून येणाऱ्या प्लेझर दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील पती, पत्नी आणि मुलगी गंभीर जखमी झाले आहेत.

गुरुवार

बोटमालकाच्या खूनप्रकरणी दोघांना नागपुरात अटक

आगशी पोलिसांनी मासेमारी बोटमालक मंजुनाथ हरीकांत यांच्या खून प्रकरणाचा वेगाने तपास करत दोघा संशयितांना नागपूर रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले. त्यानंतर आगशी पोलिसांनी दुर्योधन देवसाई मांझी (३०)​ आणि लालदेव नंदकुमार मांझी (३०) या झारखंड येथील दोघांना गोव्यात आणून अटक केली.

कोलवा येथे फ्लॅटमध्ये आढळला केनियन महिलेचा मृतदेह

कोलवा येथील वानेली भागात एका ५३ वर्षीय केनियन महिलेचा मृतदेह तिच्याच फ्लॅटमधील बाथरुममध्ये आढळून आला. शेफाली सुरेश उनाडकट (५३) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी कोलवा पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली.

मडगावात १०० किलो चिकन जप्त

मडगाव येथील एसजीपीडीए बाजारपेठेत गुरुवारी पहाटे एफडीएच्या पथकाने केलेल्या तपासणीत असुरक्षित परिस्थितीत वाहतूक आणि साठवणूक केल्या जाणाऱ्या चिकनचा साठा जप्त केला. तर, नावेलीत विनापरवाना सुरू असलेल्या समोसा युनिटवर कारवाई करत ५ हजारांचा दंड करत ते बंद करण्याच्या सूचना दिल्या.

शुक्रवार

बदनामीच्या तणावातून युवकाची गोळी झाडून घेऊन आत्महत्या

सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकतानाचा एका युवकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यामुळे निर्माण झालेल्या प्रचंड मानसिक तणावातून एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने स्वतःवर पिस्तुलाची गोळी झाडून आत्महत्या केली.


पर्यटक महिलांचे व्हिडिओ काढणाऱ्यावर कारवाई

कळंगुट येथील समुद्रकिनारा परिसरात महिला पर्यटकांचे परवानगीशिवाय व्हिडिओ आणि फोटो काढणाऱ्या एका पर्यटकाला पोलिसांनी ताब्यात घेत प्रतिबंधात्मक कारवाई केली.

हरमल येथे मोबाईल शॉपीला आग

हरमल तिठा येथील ओम मोबाईल शॉपीला शॉर्टसर्किटने आग लागून मोबाईल, बॅटरी व अन्य साधने भस्मसात झाले. आगीमुळे सुमारे तीन लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

शनिवार

वेर्णा येथे वाहनाच्या धडकेत पाच गायींचा मृत्यू

वेर्णा येथे रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या गुरांच्या कळपाला एका भरधाव वाहनाने धडक दिल्याने पाच गायींचा मृत्यू झाला तर एक गाय गंभीर जखमी झाली. याप्रकरणी पोलिसांनी वाहन चालकाला अटक केली आहे.

उपेंद्र गावकर यांच्या घरावर गोळीबार

कौटुंबिक वादातू्न उपेंद्र गावकर व त्यांच्या पत्नीवर गोळीबार करण्यात आला. मात्र, दोघांनीही सतर्कता बाळगल्याने दोघेही वाचले. याप्रकरणी डिचोली पोलिसांनी त्यांचे पुतणे प्रज्योत गावकर व गिरीश गावकर यांना अटक केली.

लक्षवेधी

बनावट ना हरकत प्रमाणपत्र वापरून पाण्याची जोडणी मिळवल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या ६४ वर्षीय नारायण मनोहर खटारे यांची दक्षिण गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत मागविलेली माहिती न दिल्यामुळे म्हापसा पालिकेचे माहिती अधिकारी विशांत नाईक यांना राज्य माहिती आयुक्तांनी २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. सध्या कार्यरत माहिती अधिकाऱ्याने तक्रारदार लेस्ली स्टिव्हन डिसोझा यांना १५ जूनपूर्वी कार्यालयात बोलावून हवी ती माहिती द्यावी, असे आदेश राज्य माहिती आयुक्त आत्माराम बर्वे यांनी दिले.

दोनापावला आणि म्हापसा येथील बंगल्यांवर सशस्त्र दरोडे टाकून लाखो रुपयांचा ऐवज पळवणाऱ्या बांगलादेशी टोळीतील सहावा संशयित मोहम्मद नाझीर याला अटक करण्यात आली. त्याला म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली.

मळा येथील चार खांब परिसरातील साकवाखालील पाण्यात पडून फ्रान्सिस वेंकय्या नेल्लाटोर (५१, चिंबल) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पणजी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. 

हेही वाचा