२ कोटींपेक्षा जास्त रोकडसह ५ आलिशान इमारती जप्त.

भुवनेश्वर : ओडिशा दक्षता विभागाने कंधमाल जिल्ह्यातील बालीगुडा येथील आयटीडीएचे सहाय्यक कार्यकारी अभियंता बैकुंठनाथ बेहरा यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. बेहरा यांनी सेवाकाळात ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमा केल्याच्या आरोपावरून त्यांच्या भुवनेश्वर, जाजपूर, बारिपदा आणि बालीगुडा येथील नऊ ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकण्यात आले. विशेष न्यायालयाच्या वॉरंटनंतर दक्षता पथकाने ही शोधमोहीम राबवली.
या कारवाईत बेहरा यांच्याकडे कोट्यवधी रुपयांचे घबाड सापडले आहे. त्यांच्या चार बँक लॉकरपैकी दोन लॉकरमधून तब्बल २ कोटी रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम जप्त करण्यात आली असून, यंत्राद्वारे या पैशांची मोजणी सुरू आहे. याशिवाय, ४५ लाख रुपयांहून अधिक बँक ठेवी, ३४१ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि १४ मौल्यवान भूखंड (प्लॉट्स) पथकाच्या हाती लागले आहेत. तांत्रिक पथकाकडून या सर्व मालमत्तेचे मूल्यांकन केले जात आहे.
शोधमोहिमेदरम्यान बेहरा यांच्या ५ आलिशान बहुमजली इमारती समोर आल्या आहेत. यामध्ये भुवनेश्वरमधील निलाद्री विहार येथील चारमजली घर, सैलाश्री विहारमधील तीनमजली इमारत आणि कानन विहार व चंद्रशेखरपूर येथील दोन दुमजली घरांचा समावेश आहे. तसेच जाजपूर जिल्ह्यातील पंडुआ येथील त्यांच्या दुमजली वडिलोपार्जित घराचीही झडती घेण्यात आली. विशेष म्हणजे, १९९९ मध्ये केवळ ६,००० रुपये महिना पगारावर कनिष्ठ अभियंता म्हणून बेहरा यांनी सरकारी नोकरी सुरू केली होती.
दुसऱ्या एका कारवाईत, कटक जिल्ह्यातील नरसिंगपूर विद्युत विभागाचा लाइनमन धर्म निरंजन चौधरी याला एका शेतकऱ्याकडून खराब विजेचा खांब बदलण्यासाठी १५,००० रुपयांची लाच घेताना दक्षता विभागाने रंगेहाथ अटक केली. अभियंता बेहरा प्रकरणातील छापेमारी अद्याप सुरू असून, संपूर्ण तपासणीनंतरच त्यांच्या एकूण बेहिशेबी मालमत्तेचा अंतिम आकडा स्पष्ट होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.