इंदूर, मध्यप्रदेश येथे ईव्ही शोरूमला भीषण आग; २० जण अडकले

शेजाऱ्यांनी दोर-शिड्यांच्या मदतीने वाचवले जीव

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
9 hours ago
इंदूर, मध्यप्रदेश येथे ईव्ही शोरूमला भीषण आग; २० जण अडकले

इंदूर : मध्यप्रदेशातील इंदूरमधील लसुडिया परिसरातील खालसा चौकाजवळ शुक्रवारी सकाळी एका इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) शोरूमला भीषण आग लागल्याने वरच्या मजल्यावरील सहा कुटुंबांतील सुमारे २० जण अडकून पडले. मात्र, शेजाऱ्यांच्या तत्परतेमुळे आणि अग्निशमन दलाच्या मदतीने सर्वांची सुखरूप सुटका करण्यात आली. नवी दिल्ली येथे हॉटेलला लागलेली आग (२१ जणांचा मृत्यू),  बिहारमधील मुजफ्फरपूर येथील एका रुग्णालयाला (५ जणांचा मृत्यू)  लागलेल्या आगीनंतर तीन दिवसांतील ही तिसरी आगीची मोठी घटना आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या तळमजल्यावरील ईव्ही शोरूममध्ये आग लागली. वरच्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये राहणारे लोक त्या वेळी झोपेत होते. धुरामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना जाग आली. खाली पाहिल्यानंतर शोरूममधून मोठ्या प्रमाणात ज्वाळा उठताना दिसल्या.

आगीमुळे जिन्याचा मार्ग बंद झाल्याने रहिवासी वरच्या मजल्यांवर अडकून पडले. त्यांच्या आरडाओरडीनंतर शेजारील इमारतीतील नागरिक मदतीसाठी धावले. त्यांनी तातडीने शिड्या आणि दोरांची व्यवस्था केली आणि अडकलेल्या लोकांना छतावर येण्यास सांगितले.

शेजाऱ्यांनी दोन्ही इमारतींच्या छतांदरम्यान शिड्या जोडून तात्पुरता मार्ग तयार केला. काहींना शिड्यांच्या मदतीने तर काहींना दोर पकडून खाली उतरवण्यात आले.

दरम्यान, अग्निशमन दलाने दोन पाण्याच्या टँकरच्या मदतीने आग नियंत्रणात आणली. सुदैवाने आगीचा फैलाव फ्लॅटपर्यंत झाला नाही, त्यामुळे घरातील साहित्य सुरक्षित राहिले. मात्र, शोरूममध्ये ठेवण्यात आलेल्या सर्व इलेक्ट्रिक दुचाकी आगीत जळून खाक झाल्या.

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून; आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हेही वाचा