आशियातील युद्धाचा कर्करोगाच्या उपचारांवर परिणाम; दोन महत्त्वाच्या किमो औषधांचा देशभर तुटवडा

दोन आठवड्यांपासून तुटवडा; गंभीर परिणाम होण्याची भीती

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
11 hours ago
आशियातील  युद्धाचा कर्करोगाच्या  उपचारांवर परिणाम; दोन महत्त्वाच्या किमो औषधांचा देशभर तुटवडा

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाचा परिणाम आता भारतातील कर्करोग उपचार व्यवस्थेवरही दिसू लागला आहे. कर्करोग उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी सिस्प्लॅटिन आणि कार्बोप्लॅटिन या दोन महत्त्वाच्या किमोथेरपी औषधांचा देशभरात मागील दोन आठवड्यांपासून तुटवडा आहे. 

यामुळे कर्करोगतज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली असून, रुग्णांना औषधांसाठी एका औषधलयातून दुसऱ्या औषधालयात भटकंती करावी लागत आहे. तज्ज्ञांच्या मते, होर्मुझ संकटामुळे कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्याचवेळी ही औषधे सरकारी किंमत नियंत्रणाखाली असल्याने औषध उत्पादक कंपन्यांना किंमती वाढवता येत नसल्यामुळे उत्पादनात कपात करण्यात आली आहे.

सर गंगाराम रुग्णालयातील मेडिकल ऑन्कोलॉजी विभागाचे अध्यक्ष डॉ. श्याम अग्रवाल यांनी सांगितले की, “आमच्या रुग्णालयाच्या फार्मसीमध्ये सिस्प्लॅटिन आणि कार्बोप्लॅटिनचा साठा संपला आहे. माझ्या क्लिनिकमधील जवळपास ७० टक्के रुग्णांना या औषधांची गरज असते. आता रुग्ण औषधांच्या शोधात एका मेडिकल स्टोअरमधून दुसऱ्याकडे फिरत आहेत.”

दिल्लीतील एम्सचे कर्करोगतज्ज्ञ डॉ. अभिषेक शंकर यांनीही मागील दोन आठवड्यांपासून या औषधांचा तुटवडा असल्याचे स्पष्ट केले. काही डॉक्टरांच्या मते, कमी डोसची औषधे पूर्णपणे गायब झाली असून, काही ठिकाणी फक्त जास्त डोस उपलब्ध आहेत.

मुंबईतील लिलावती रुग्णालयातील ऑन्कोलॉजिस्ट डॉ. मोहन मेनन यांनी सांगितले की, प्लॅटिनमवर आधारित सर्व किमो औषधांचा तुटवडा जाणवत आहे. “२०२३ मध्ये प्लॅटिनमचा दर प्रति ग्रॅम सुमारे २,७०० रुपये होता, तो आता ७,८०० रुपयांपेक्षा जास्त झाला आहे,” असे त्यांनी सांगितले.

गंभीर परिणाम होण्याची भीती 

या परिस्थितीमुळे तोंडाचा, फुफ्फुसांचा, गर्भाशयमुखाचा, अन्ननलिकेचा, अंडाशयाचा आणि स्तनाच्या कर्करोगाच्या उपचारांवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


हेही वाचा