विलंब केल्यामुळे मद्रास उच्च न्यायालयाची सर्वोच्च न्यायालयावर टीका

मद्रास: मद्रास उच्च न्यायालयाने तब्बल दहा वर्षांनंतर महत्त्वपूर्ण निकाल देत माजी विधानसभा अध्यक्ष एम. अप्पावू (M. Appavu) यांना २०१६ मधील राधापूरम विधानसभा निवडणुकीतील अधिकृत विजयी उमेदवार घोषित केले. न्यायालयाने म्हटले आहे की, निवडणूक वादाच्या निर्णयातील प्रचंड विलंबामुळे लोकशाही प्रक्रियेलाच धक्का बसला.
२०१६ च्या विधानसभा निवडणुकीत आयएस इनबदुराई यांना केवळ ४९ मतांच्या फरकाने विजयी घोषित करण्यात आले होते. मात्र, अप्पावू यांनी अनेक वैध मते चुकीने बाद करण्यात आल्याचा दावा करत निकालाला न्यायालयात आव्हान दिले होते.
न्यायमूर्ती जी. जयचंद्रन यांच्या खंडपीठाने निरीक्षण नोंदवले की, निवडणूक याचिकांचा जलद निपटारा करणे आवश्यक असताना या प्रकरणात संपूर्ण विधानसभा कार्यकाळ संपल्यानंतर निकाल लागणे ही गंभीर बाब आहे. अशा विलंबामुळे मतदारांना त्यांच्या खऱ्या प्रतिनिधीपासून वंचित राहावे लागल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
२०१९ मध्ये न्यायालयाने सर्व मतांची पुन्हा मोजणी करण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी पोस्टल बॅलेट आणि ईव्हीएम मतांची फेरमोजणी करण्यात आली. मात्र त्याच दिवशी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर निकाल जाहीर करण्यास स्थगिती देण्यात आली.
सहा वर्षे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित
सहा वर्षे प्रकरण प्रलंबित राहिल्यानंतर अखेर मे २०२६ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा कार्यकाळ संपल्याचे कारण देत प्रकरण निकाली काढले. यावर नाराजी व्यक्त करत उच्च न्यायालयाने म्हटले की, मूळ कायदेशीर प्रश्नावर निर्णय देणे आवश्यक होते.
फेरमोजणीत अप्पावू यांना १५३ वैध मते
फेरमोजणीनंतर वादग्रस्त २०३ पोस्टल बॅलेटपैकी १५३ वैध मते अप्पावू यांच्या बाजूने असल्याचे आढळले. तर प्रतिस्पर्ध्याच्या बाजूने फक्त एक मत वैध ठरले. यामुळे अप्पावू हे प्रत्यक्षात १०३ मतांनी विजयी ठरल्याचे न्यायालयाने नमूद केले.
विधानसभा नोंदींमध्ये अप्पावू यांचे नाव नोंदवावे : उच्च न्यायालय
विधानसभा नोंदींमध्ये दुरुस्ती करून २०१६-२०२१ कालावधीसाठी राधापूरम मतदारसंघाचे निवडून आलेले प्रतिनिधी म्हणून अप्पावू यांचे नाव नोंदवावे; असा आदेश न्यायालयाने दिला. तसेच, इनबदुराई यांना माजी आमदार म्हणून; मिळणारे पेन्शन व इतर लाभ मिळणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.