ओमानजवळ ड्रोन हल्ला; तेल लोडिंग बंद, युद्ध पुन्हा सुरू करण्याचा ट्रम्प यांचा इराणला इशारा

इस्रायल-लेबनॉन युद्धविरामाला पुन्हा संजीवनी

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
12 hours ago
ओमानजवळ ड्रोन हल्ला; तेल लोडिंग बंद, युद्ध पुन्हा सुरू करण्याचा ट्रम्प यांचा इराणला इशारा

तेहरान : ओमानजवळील महत्त्वाच्या तेल टर्मिनल परिसरात झालेल्या ड्रोन हल्ल्यामुळे जागतिक स्तरावर पुन्हा तणाव वाढला आहे.  ओमानच्या मीना अल फहल तेल टर्मिनलवरील कच्च्या तेलाच्या लोडिंग प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.  अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कठोर इशारा देत, अमेरिकन सैनिकांच्या हत्येचा कोणताही प्रकार झाला तर युद्ध पुन्हा सुरू करण्यासाठी ते "पुरेसे कारण" ठरेल, असे म्हटले आहे.

व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी इराणवर जोरदार टीका करत, “अमेरिकन सैनिक मारले गेले तर पुन्हा युद्ध सुरू करण्यासाठी ते चांगले कारण ठरेल. इराणची नौदल आणि हवाई क्षमता जवळपास संपुष्टात आली असून; त्यांची अनेक जहाजे नष्ट केली आहेत’’, असा दावा केला आहे. 

इस्त्रायल आणि लेबनॉनची युद्धविरामावर सहमती

दुसरीकडे, मध्यपूर्वेतील तणाव कमी करण्याच्या प्रयत्नांत इस्रायल आणि लेबनॉन यांनी पुन्हा एकदा नाजूक युद्धविरामावर सहमती दर्शवली आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेल्या या कराराची संयुक्त घोषणा अमेरिका, इस्रायल आणि लेबनॉनने बुधवारी केली.

या नव्या करारानुसार, दोन्ही बाजूंमध्ये पुढील काही आठवड्यांत व्यापक शांतता करारासाठी चर्चा सुरू ठेवली जाणार आहे. मात्र, या करारातील काही अटी वादग्रस्त ठरत आहेत. विशेषतः लेबनॉनमध्ये काही ‘सुरक्षा क्षेत्रे’ निर्माण करण्याचा प्रस्ताव आणि इराण समर्थित हिजबुल्लाह संघटनेच्या भविष्यातील विसर्जनाचा मुद्दा चर्चेचा विषय ठरला आहे.

लेबनॉनचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ औन यांनी या कराराला “अंतिम आणि व्यापक युद्धविरामासाठीची शेवटची संधी” असे संबोधले. यापूर्वी नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेला युद्धविराम करार टिकू शकला नव्हता.

तेल सुविधांवरील हल्ल्यामुळे तणाव 

ओमानमधील तेल सुविधांवरील हल्ला, इराण-अमेरिका तणाव आणि इस्रायल-लेबनॉन युद्धविराम या घटनांमुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती पुन्हा एकदा अस्थिर बनल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

हेही वाचा