सोलापूर-गोवा, हैदराबाद विमानसेवा १९ जूनपासून पुढील ३ महिन्यांसाठी बंद

Story: वेब डेस्क| गोवन वार्ता |
25 mins ago
सोलापूर-गोवा, हैदराबाद विमानसेवा १९ जूनपासून पुढील ३ महिन्यांसाठी बंद

सोलापूरहून गोवा आणि हैदराबादसाठी हवाई सफर करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मान्सून काळातील प्रतिकूल हवामान आणि सोलापूर विमानतळावरील पायाभूत सुविधांचा अभाव यांमुळे 'फ्लाय ९१' विमान कंपनीने सोलापूर-गोवा आणि सोलापूर-हैदराबाद या दोन्ही मार्गांवरील विमानसेवा पुढील २ ते ३ महिन्यांसाठी तात्पुरती बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. येत्या १९ जूनपासून या दोन्ही मार्गांवरील उड्डाणे थांबवली जाणार असून, कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरील तिकीट विक्रीही बंद करण्यात आली आहे.

फ्लाय ९१ कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर विमानतळावर अद्याप 'नाइट लँडिंग'ची सुविधा उपलब्ध नाही. पावसाळ्यात सोलापूर परिसरातील दृश्यमानता कमालीची खालावते. विशेषतः सोलापूर ते गोवा ही विमानसेवा सायंकाळच्या वेळी असल्याने, यापूर्वीही खराब हवामानामुळे अनेक उड्डाणे रद्द करावी लागली होती. विमान प्रवासातील विस्कळीतपणा टाळण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी कंपनीने हा कठोर निर्णय घेतला आहे.

वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या या विमानसेवेला सोलापूरसह लातूर, धाराशिव (उस्मानाबाद), विजयपूर आणि कलबुर्गी परिसरातील प्रवाशांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत असल्याने आणि मागणी वाढल्यामुळे काही वेळा तिकिटांचे दर थेट अडीच हजारांवरून १० हजार रुपयांच्या पार गेले होते. मात्र, एकाच सर्किटमध्ये (गोवा-सोलापूर-हैदराबाद आणि परतीचा प्रवास) चालणाऱ्या या सेवा हवामानातील लहरीपणामुळे पूर्णपणे विस्कळीत होत होत्या.

विमानसेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली असली तरी सोलापूर विमानतळावरील फ्लाय ९१ कंपनीची यंत्रणा आणि कर्मचारी पूर्ववत कार्यरत राहणार आहेत. कंपनीचे प्रमुख मनोज चाको यांनी सांगितले की, पावसाळ्यातील कमी दृश्यमानता आणि घटणारी प्रवासी संख्या लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. हवामान अनुकूल झाल्यास किंवा दुपारच्या सत्रात उड्डाणे शक्य असल्यास सेवा अपेक्षेपेक्षा लवकर सुरू केली जाईल. अन्यथा, ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यापासून ही विमानसेवा पुन्हा एकदा प्रवाशांच्या सेवेत पूर्ववत दाखल होईल.


हेही वाचा