बी. एल. संतोष यांच्यासोबत दामू नाईक यांची महत्त्वपूर्ण बैठक; केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा लवकरच.

पणजी : गोव्यात सर्वच राजकीय पक्षांकडून आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. यामध्ये सत्ताधारी भाजपने एक पाऊल पुढे टाकत २०२७ चा आपला कृती आराखडा केंद्रीय नेतृत्वाला सादर केला आहे. आगामी विधानसभा निवडणूक तसेच पक्षाच्या संघटनात्मक कामांविषयी राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्यासोबत माझी सविस्तर चर्चा झाली आहे,अशी माहिती प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांनी दिली. तसेच, लवकरच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन गोव्यातील एसटी आरक्षण अंमलबजावणीच्या संदर्भात चर्चा केली जाईल,असेही दामू नाईक यांनी स्पष्ट केले.
प्रदेश भाजपा अध्यक्ष दामू नाईक हे शनिवारी रात्री दिल्लीत पोहोचले होते. रविवारी सकाळी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्यासोबत त्यांची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत २०२७ चा कृती आराखडा सादर करण्यासोबतच निवडणुकीची पूर्वतयारी आणि संघटनात्मक कामांवर सखोल चर्चा करण्यात आली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारची कामे तसेच लोककल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. यासाठी मतदारसंघ आणि बूथ पातळीवर कार्यकर्त्यांच्या विशेष बैठका घेतल्या जातील.

येत्या विधानसभा निवडणुकीत गोव्यात एसटी आरक्षण लागू करण्यासाठी आमचे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. विधानसभेत एसटी आरक्षणाचा कायदा संमत झाला असला, तरी निवडणूक आयोगाला आदेश देणारी अंतिम अधिसूचना अजून जारी व्हायची आहे. हा तांत्रिक प्रश्न सोडवण्यासाठी आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली जाईल. पक्षाचा अध्यक्ष या नात्याने मी स्वतः, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आदिवासी कल्याण मंत्री रमेश तवडकर केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेणार आहोत. यावेळी गोव्यातून जे कोणी नेते दिल्लीत पोहोचतील, त्यांना सोबत घेऊन ही भेट घेतली जाईल, असे प्रदेश भाजपा अध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले.