कर्जाची रक्कम फेडूनही सोन्याचे दागिने परत केले नसल्याने पोलिसांत तक्रार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
07th June, 11:52 pm
कर्जाची रक्कम फेडूनही सोन्याचे दागिने परत केले नसल्याने पोलिसांत तक्रार

वास्को : सोन्याचे दागिने गहाण ठेऊन घेतलेल्या कर्जाची रक्कम पूर्णपणे फेडली असतानाही सडा येथील संबंधित ज्वेलर्सने सोन्याचे सर्व दागिने परत केले नसल्याप्रकरणी प्रज्योत नाईक यांनी मुरगाव पोलीस स्थानकात तक्रार केली आहे. याप्रकरणी मुरगाव पोलिसांनी ज्वेलर्सविरोधात गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रज्योत नाईक यांनी अंदाजे १७१.५१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने संबंधित ज्वेलर्सकडे गहाण ठेवले होते. या दागिन्यांची किंमत सुमारे २२ लाख रुपये आहे. दागिने गहाण ठेऊन घेतलेल्या कर्जाची रक्कम प्रज्योत यांनी पूर्णपणे फेडल्यावर ज्वेलर्सने संपूर्ण दागिने देण्याऐवजी फक्त ४३ ग्रॅम वजनाचे दागिने दिले. उर्वरित अंदाजे १२८.५१ ग्रॅम दागिने अद्याप परत केले नाहीत. प्रज्योत यांनी वारंवार आपल्या दागिन्यांसंबंधी चौकशी करूनही त्याला ते उर्वरित दागिने परत मिळाले नाहीत. संबंधित ज्वेलर्सने आपली फसवणूक केल्याप्रकरणी प्रज्योत यांनी मुरगाव पोलीस स्थानकात तक्रार केली. अपहार केल्याप्रकरणी मुरगाव पोलिसांनी तपास सुरु केला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सूरज नाईक पुढील चौकशी करीत आहेत. 

हेही वाचा