नागरिक वार्ता : मिरामारच्या ‘लेन नंबर १०’मधील समस्या दूर करण्याची नितांत गरज

बंद पडणारे पथदीप, धोकादायक झाडावर उपाययोजना आवश्यक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
07th June, 11:55 pm
नागरिक वार्ता : मिरामारच्या ‘लेन नंबर १०’मधील समस्या दूर करण्याची नितांत गरज

नीना नाईक
गोवन वार्ता
पणजी : दै. गोवन वार्ता हे वृत्तपत्र नेहमीच नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत असते. ‘नागरिक वार्ता’ हा उपक्रमही व्यवस्थेला कानपिचक्या देणारा ठरून त्याद्वारे काही गोष्टी नक्कीच बदलू शकतात. मी पणजीतील एका भागाबद्दल मत मांडते.
मिरामार लेन नंबर १० येथे रस्त्यावरील दिवे आठवडाभर बंद होते. वीज खात्याच्या कार्यालयात फोन केला की कर्मचारी येतात व दुरुस्ती करतात. मात्र दिवे कालांतराने बंद होतात. नंतर शेजारचे सर्व जण मिळून आळीपाळीने फोनवर तक्रार करतात. कारण रोज एकच आवाज आला, तर कदाचित दुर्लक्ष होऊन कायमचे अंधारात राहावे लागू शकते.


लटकणाऱ्या वायर धोकादायक
छायाचित्रात वायर लटकताना दिसत आहेत. त्या गतवर्षीच्या जूनपासून तशाच आहेत. त्यावेळी विजेचा लपंडाव सुरू होता. पाऊसही होता. म्हणून फिडरवरून सप्लाय दिला गेला. पाऊस झाल्यावर पुन्हा या वायर पूर्ववत केल्या जातील असे सांगण्यात आले. त्यानंतर खात्याला लेखी पत्र पाठवले. उत्तर आले नाही. मात्र बोलणे झाल्यानंतर खात्याच्या लोकांनी भेट दिली आणि नगरपालिका रस्ता खोदण्यासाठी परवानगी देत नसल्याचे सांगितले. चूक नगरपालिकेची नाही. रस्त्याचे नुकतेच डांबरीकरण केले होते.

झाड कोसळ्याचा धोका
मिरामारचा लेन नंबर १० हा पॅच उजवीकडे छोटा आहे, तर डावीकडे मोठा आहे. जेमतेम चार घरे उजवीकडे आहेत. त्यात एक रिकामा प्लॉट आहे. त्यातील मोठे झाड दरवर्षी छाटून घेतले जाते. अाता त्या अवाढव्य झाडाला वाळवी लागली आहे. पाऊस-वारा आला की ते झाड कुरकुरते. कुठल्याही क्षणी मोडून पडू शकते. ते मुळासकट काढून टाकण्यासाठी अर्ज केले, पण प्रतिसाद नाही. हे झाड जवळच्या घरावर कोसळू शकते. तसे घडण्याआधी संबंधितांनी ते हटविणे गरजेचे आहे.    

हेही वाचा