मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाचा आदेश

प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून एका उत्पादन शुल्क खात्याच्या कर्मचार्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी वाहनचालक सुदेश गावस देसाई याला मडगाव येथील मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने ५२ लाख ३६ हजार ९४० रुपयांची भरपाई मृताच्या वारसांना देण्याचे आदेश दिले. पीठासीन अधिकारी राम एस. प्रभू देसाई यांनी हा निकाल दिला.
पारोडा-केपे येथे सातेरी मंदिराजवळ २२ फेब्रुवारी २०२२ रोजी हा अपघात झाला होता. उत्पादन शुल्क विभागात कार्यरत असलेले साहाय्यक रक्षक विजय पैंगीणकर दुचाकीवरून जात असताना, समोरून येणार्या मारुती सुझुकी गुड्स कॅरिअरने त्यांना धडक दिली. या अपघातात विजय पैंगीणकर यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी श्वेता पैंगणकर यांनी न्यायालयात नुकसान भरपाईसाठी दावा दाखल केला होता. तपासात अपघातावेळी वाहनचालक सुदेश गावस देसाई याच्या रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण १२० मिलीग्रॅम इतके होते, जे कायदेशीर मर्यादेपेक्षा जास्त आहे. या प्रकरणात कुडचडेचे नगरसेवक दामोदर भेंडे यांनी प्रत्यक्षदर्शी म्हणून दिलेली साक्ष न्यायालयाने ग्राह्य धरली.
चालक मद्यधुंद असल्याने त्याने विमा पॉलिसीच्या अटींचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे भरपाई देण्याची मुख्य जबाबदारी चालकाची आहे. मात्र, न्यायालयाने ‘पे अँड रिकव्हर’ या तत्त्वाचा वापर करत, रिलायन्स जनरल इन्शुरन्स या विमा कंपनीला आधी ही रक्कम अर्जदाराला देण्यास सांगितले. त्यानंतर ती चालकाकडून वसूल करण्याची मुभा दिली आहे.
रक्कम जमा करण्यासाठी १५ दिवसांची मुदत
न्यायालयाने मृत विजय पैंगीणकर यांचे मृत्यूवेळीचे वय आणि वार्षिक उत्पन्न लक्षात घेऊन ५२,३६,९४० रुपये भरपाई निश्चित केली आहे. या रकमेवर ६.८० टक्के व्याजही द्यावे लागणार आहे. वाहनचालक सुदेश देसाई याने १५ दिवसांच्या आत ही रक्कम जमा करावी. त्यात ते अपयशी ठरल्यास विमा कंपनीने ही रक्कम न्यायाधिकरणाच्या खात्यात जमा करावी आणि नंतर ती चालकाकडून वसूल करावी, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.