सोशल मीडिया की 'डिजिटल फाशीचा चौक'?

प्रत्येक स्क्रीनच्या मागे, प्रत्येक व्हिडिओच्या मागे एक जिवंत माणूस असतो, त्याला भावना असतात आणि त्याचे एक कुटुंब असते, याचे भान आजचा समाज विसरत चालला आहे. आज प्रश्न केवळ कचरा टाकण्याचा किंवा चूक करण्याचा नाही, तर 'माणूस म्हणून आपली माणुसकी कुठे हरवली आहे?' हा आहे.

Story: विशेष |
07th June, 08:34 pm
सोशल मीडिया की 'डिजिटल फाशीचा चौक'?

म्हापसा येथील २२ वर्षीय सॅम्युअल नावाच्या तरुण विद्यार्थ्याने स्वतःवर गोळी झाडून घेऊन आपले आयुष्य संपवले. त्याचे कारण काय, तर त्याने रस्त्याच्या कडेला कचरा टाकल्याचा एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. कचरा टाकणे ही चूकच होती, त्यावर कायदेशीर कारवाई होणेही गरजेचे होते; पण त्या एका चुकीसाठी संपूर्ण समाजाने त्याला 'डिजिटल फाशी' दिली. व्हिडिओ व्हायरल झाला, टीकेची झोड उठली, कमेंट बॉक्समध्ये शेलक्या शब्दांत अपमान झाला. कायदेशीर कारवाईचा ताण आणि सार्वजनिक अपमानाच्या मानसिक छळाला कंटाळून एका कोवळ्या तरुणाने आपले जीवन संपवले. मोबाईल आज संवादाचे साधन कमी आणि माणसाचा जीव घेणारे हत्यार जास्त बनू लागला आहे, हेच या घटनेवरून सिद्ध होते.

एखाद्या गुन्ह्यासाठी किंवा चुकीसाठी देशात कायदा आणि न्यायव्यवस्था आहे. परंतु, आजकाल सोशल मीडिया वापरणारा प्रत्येक नागरिक स्वतःलाच 'न्यायाधीश' समजू लागला आहे. 

कमेंट करणाऱ्या शेकडो लोकांना हे समजतच नाही की, त्यांच्या एका कमेंटमुळे समोरच्या व्यक्तीच्या मनावर काय परिणाम होत असेल. माणूस म्हणून आपल्यातली संवेदनशीलता संपत चालल्याचे हे प्रतीक आहे.

एखाद्याची चूक दिसली की ती संबंधित प्रशासनाकडे नोंदवण्याऐवजी, त्याचा व्हिडिओ बनवून 'व्ह्यूज' आणि 'लाईक्स' मिळवण्यासाठी तो आधी सोशल मीडियावर टाकण्याची चढाओढ लागली आहे. याचाच परिणाम म्हणून अनेकदा अपघातात सापडलेल्या व्यक्तीला मदत करण्याऐवजी मोबाईलवर व्हिडिओ किंवा फोटो काढून तो सोशल मीडियावर टाकण्यात अनेक जण धन्यता मानतात. स्वतःचे खरे नाव न वापरता सोशल मीडियावर वावरता येत असल्यामुळे, लोक कोणत्याही परिणामाची भीती न बाळगता कुणावरही अत्यंत हिंसक आणि खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात. एखादा व्हिडिओ समोर आला की सत्यता न पडताळता लाखो लोक कमेंट बॉक्समध्ये शिवीगाळ, शाप आणि मानसिक खच्चीकरण करायला सुरुवात करतात. यालाच 'डिजिटल मॉब लिंचिंग' म्हणतात.

सॅम्युअलची घटना ही एकमेव नाही. अलीकडच्या काळात अशा अनेक घटना समोर आल्या आहेत, जिथे सोशल मीडियावरील छळाने लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त केले:

हा डिजिटल भस्मासुर केवळ सॅम्युअलसारख्या सामान्य तरुणालाच नाही, तर ज्यांना आपण आपले आदर्श मानतो, त्या आयपीएल खेळाडूंना आणि सेलिब्रिटींनाही सोडत नाही. हार्दिक पांड्याचा मैदानातील फॉर्म असो वा के. एल. राहुलची कामगिरी, सोशल मीडियाचा जमाव त्यांच्यावर तुटून पडतो. विराट कोहलीच्या अपयशाचे खापर अनुष्का शर्मावर फोडण्यापर्यंत या जमावाची विकृती पोहोचली आहे. सिनेजगतातील अनेकांना या ऑनलाइन छळामुळे हतबल व्हावे लागते, तेव्हा विचार करा की सॅम्युअलसारखा २२ वर्षांचा सामान्य तरुण या लाखो लोकांच्या मानसिक हल्ल्यासमोर कसा टिकणार? ही समस्या फक्त एका शहरापुरती किंवा व्यक्तीपुरती मर्यादित नसून, संपूर्ण इंटरनेट संस्कृतीला लागलेली कीड आहे.

आता वेळ आली आहे की आपण केवळ हळहळ व्यक्त करून न थांबता यावर ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत:

 दिसते तसे नसते, म्हणूनच जग फसते या म्हणीप्रमाणे  सोशल मीडियावर दिसणारी प्रत्येक गोष्ट शंभर टक्के खरी नसते. त्यामुळे कोणताही व्हिडिओ शेअर करण्यापूर्वी किंवा त्यावर प्रतिक्रिया देण्यापूर्वी त्याची सत्यता जाणून घेणे आवश्यक आहे.

 जर कोणी चूक करत असेल, तर त्याचे व्हिडिओ इंटरनेटवर टाकून त्याला बदनाम करण्याऐवजी पोलिसांत किंवा संबंधित खात्याकडे आपण तक्रार करू शकतो. कायदा हातात घेण्याचा अधिकार आपणा कोणालाच नाही.

 एखाद्याला सोशल मीडियावर ट्रोल करून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल व्हायला हवा. सायबर पोलिसांनी अशा प्रवृत्तींवर कडक 'वॉच' ठेवला पाहिजे.

 शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना 'डिजिटल एथिक्स' शिकवणे गरजेचे आहे. तसेच, अशा परिस्थितीतून जाणाऱ्या तरुणांना तात्काळ मानसिक समुपदेशन  मिळण्याची सोय असायला हवी.

सॅम्युअलची चूक क्षणिक असू शकते; पण त्याच्या मृत्यूने निर्माण झालेली पोकळी त्याच्या आई-वडील आणि नातेवाईकांसाठी कायमची आहे. कचऱ्याच्या एका पिशवीपेक्षा, इंटरनेटवरील लोकांची 'असंवेदनशीलता' अधिक घातक ठरली.

प्रत्येक स्क्रीनच्या मागे, प्रत्येक व्हिडिओच्या मागे एक जिवंत माणूस असतो, त्याला भावना असतात आणि त्याचे एक कुटुंब असते, याचे भान आजचा समाज विसरत चालला आहे. आज प्रश्न केवळ कचरा टाकण्याचा किंवा चूक करण्याचा नाही, तर 'माणूस म्हणून आपली माणुसकी कुठे हरवली आहे?' हा आहे. जर आपण अजूनही सुधारलो नाही, तर सोशल मीडिया नावाचा हा भस्मासुर आपल्याच घरातील पुढच्या सॅम्युअलला गिळंकृत करायला मागे-पुढे पाहणार नाही. वेळीच जागे होऊया, संवेदनशील बनूया!

- दीपक शिवराम गावस, केरी-सत्तरी