मंगळसूत्र : मानवी मानसिकतेचा हलकल्लोळ..!

Story: पुस्तक |
06th June, 11:19 pm
मंगळसूत्र :  मानवी मानसिकतेचा हलकल्लोळ..!

​​​​​​जीवन जगताना माणसाच्या आयुष्यात अनेक वळणे येतात. प्रत्येक वळण नवी माणसे, नवे प्रसंग घेऊन येते अन् त्यांतून तरल लेखणीतून साकारतात कथा, कविता, कादंबऱ्या. लेखक आणि त्याचे साहित्य हे समाजमनाचे प्रतिबिंब असते. साहित्यात चितारलेल्या घडामोडी या जगाच्या पाठीवर कुठे ना कुठे घडतच असतात. साहित्याला काल्पनिकतेची जोड असली तरी त्याला नेहमीच सत्याची अदृश्य किनार असते. हीच प्रचिती 'मंगळसूत्र' हा कथासंग्रह वाचताना येते.

​कथासंग्रहाच्या सुरुवातीलाच या कथांना सत्याचा स्पर्श असल्याची प्रांजळ कबुली लेखक देतो; म्हणूनच या कथा कधीही वाचल्या तरी कालबाह्य वाटत नाहीत. समाजात कितीही उलाढाली झाल्या तरी मानवी मन, भाव-भावनांवर अवलंबून असलेली जीवनसंस्था आज, काल आणि उद्याही तशीच राहणार आहे. तिला सहजासहजी बदलणे शक्य नाही. या कथासंग्रहात एकूण दहा कथा आहेत. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील पैशांना गुंडाळलेले मंगळसूत्र अन् अर्धवट खुली खिडकी नि एक खिन्न मनाने मर्मभेदी नजरेने पाहणारी वयस्कर स्त्री काळजाचा ठाव घेते.

​कथासंग्रहातील पहिलीच कथा 'मंगळसूत्र' विद्रोह समोर घेऊन येते. जवळच्या नात्याचा फायदा घेत कथेतील नायकाच्या आत्याचा नवरा त्याच्या आईच्या दागिन्यांसह मंगळसूत्र मागून नेतो आणि द्यायला मात्र आज-उद्या करत चक्क वीस वर्षे टाळतो. शेवटी नायक हातघाईवर येतो, त्यावेळी लोकलाजेस्तव तो दागिने नि मंगळसूत्र परत करतो; मात्र दिलेल्या वस्तूंपेक्षा परत केलेल्या वस्तूंचे मोल अर्धे असल्याने नायक व त्याचे कुटुंब फसवले जाते. 'शिमेझाड' या कथेतून निरागस भक्तीची प्रचिती नि फसवणुकीची शिक्षा दिसून येते. निरागस सोमुला फसवणारा काजू बियावाला शिमेपल्याड जाण्याआधीच वेडा होऊन आपल्या वाईट कर्माची शिक्षा भोगतो.

​मातृत्वाची आस मनी बाळगणारी, मात्र त्याची नैसर्गिक चिन्हेच नसल्याने व्यसनाच्या आहारी गेलेली तरुणी शेवटी कैक जणांच्या पुरुषी वासनेला बळी पडून जीव गमावते अन् ती गेल्यावर तिचे मातृत्व सिद्ध होते, अशी नियतीच्या डावात हरलेली 'बेबदुल'. लोभ माणसाला नानाविध कृत्ये करायला भाग पाडतो. उच्चशिक्षित सुभाषही आपल्या वडिलांच्या नोकरीच्या लोभापायी त्यांचा जीव घेतो अन् शेवटी पकडला जातो, त्याचे चित्रण 'पापाचो खून' या कथेत आलेले आहे.

​ज्या आपल्या बायकोचे सौंदर्य नवरा गर्वाने सगळीकडे मिरवत असतो, तेच त्याच्या विश्वासघाताला कारणीभूत ठरते अन् त्याच्या हातून दोन गुन्हे घडवते, अशी 'स्वप्नाली'ची पार्श्वभूमी आहे. झाडांना बांडगुळांपासून जपणारा उर्मो आपल्या जीवापाड जपलेल्या थोरल्या लेकीकडून अनावधानाने घडलेल्या अपराधाबद्दल तिला इतर मुलींच्या आयुष्यातली बांडगूळ समजून दूर करतो, त्याचे हृदयद्रावक चित्रण 'बेंदुल्ल' या कथेत आलेले आहे.

​'कर्म फिरून आपल्यापाशी येते.' या उक्तीप्रमाणे शांतीला दुसऱ्या मुलीसाठी नाकारणाऱ्या प्रियकराची ती बायको लग्नानंतर दोन दिवसांत शांतीच्या वडिलांसोबत पळून जाते अन् त्याला शांतीच्या हृदयातील नाकारल्याची सल उमगते; ती 'शांती' या कथेतून चितारली आहे. मतिमंद मुलगा जन्माला आल्यानंतर त्याला जपणारी तीन माणसे एकापाठोपाठ एक निघून जातात, त्यावेळी त्या अभागी जीवाची अधिक फरफट होऊ नये म्हणून त्याच्या चिरशांतीची प्रार्थना करण्याची वेळ इतरांवर येते, याचे चित्रण 'रुपेश' या कथेत आलेले आहे.

​आपल्यावर झालेल्या आरोपांमुळे संगीतप्रेमी नायक संगीत क्षेत्र सोडून पत्रकारितेत येतो; मात्र तेथे जम बसलेल्या त्याला पुन्हा संगीत क्षेत्राची ओढ निर्माण करणारे वादळ त्याच्या आयुष्यात येते, पण पत्रकारितेतील सर्वोच्च पुरस्कार त्याच्या मनातील द्वंद्व संपवतो; ती कथा म्हणजे 'एसएमएस'. बाह्य सौंदर्यावर भाळून आयुष्य भरकटवणारा अन् त्याच वेळी दुर्लक्षित झाल्याने दुसरीकडे आकृष्ट होण्याचा विरोधाभास '८ नंबर हाउसिंग बोर्ड' या कथेमधून दिसून येतो.

​माणूस म्हटला की चांगले आणि वाईट याचे संमिश्र मिश्रण. कोणीही मुळात शंभर टक्के चांगला किंवा वाईट नसतो. माणसाच्या वागण्याला सभोवतालची परिस्थिती तसेच त्याचा स्वतःच्या भावनांवरील संयम कारणीभूत असतो. कधीतरी हा संयमाचा बांध असह्य होतो अन् माणसाचे मन बेभान होत समोर येईल त्यात समरस होते. यामुळे कधी माणूस भरकटतो अथवा कधीतरी प्रयत्नपूर्वक मोहातून सावरतो. या भरकटण्या-सावरण्याचे द्वंद्व लेखकाने या कथांच्या माध्यमातून अचूक टिपले आहे.

​या कथा गोव्यात घडतात, त्यामुळे यात काणकोण, मडगाव, फोंडा, कुंकळ्ळी, केपे या ठिकाणांचा उल्लेख आढळतो. या कथासंग्रहाची भाषा सरळ, सोपी आहे. या कथा दक्षिण गोव्यात घडत असत्या तरीही तेथील बोली कोंकणीचा वापर न करता प्रमाण कोंकणीवर लेखकाने भर दिला आहे; म्हणूनच वाचताना कोणतीही अडचण येत नाही. मानवी भावनांच्या हलकल्लोळातून जन्माला आलेल्या क्रोध, करुण, सुरस, शृंगार अन् शोकात्मिकतेचा जिवंत अनुभव घेण्यासाठी सर्वांनी वाचावा 'मंगळसूत्र'..!

 ​​​​कथासंग्रह : मंगळसूत्र (कोंकणी) ​​​​लेखक : संजय बोरकर


अनु देसाई, हळर्ण पेडणे-गोवा