बेडकाची अट- (भाग २)

उन्हाळ्याच्या दिवसांत गरोदर बायकोचे दोडक्याचे डोहाळे पुरवण्यासाठी निघालेल्या एका शेतकऱ्याला नदीकाठी बोलणारा बेडूक भेटतो आणि तिथूनच सुरू होते एका अजब शर्तीची ही रंजक लोककथा.

Story: भरजरी |
06th June, 11:14 pm
बेडकाची अट- (भाग २)

न​ऊ महिने नऊ दिवस होताच शेतकऱ्याच्या बायकोला बाळंतपणाच्या कळा जाणवू लागल्या आणि तिच्या पोटी एका सुंदर कन्येने जन्म घेतला. गोरी गोरी पान आणि काळ्याभोर डोळ्यांची ती मुलगी खूपच गोंडस दिसत होती. मुलगी झाली खरी, पण मुलीला पाहताच आनंद होण्याऐवजी शेतकऱ्याच्या बायकोला बेडकाने घातलेली ती जुनी अट आठवली.

बेडकाने सांगितले होते की, जर मुलगी जन्माला आली तर तिचे लग्न आपल्याशी करून द्यायचे. माझ्या या गोंडस, नाजूक मुलीला त्या बेडकाच्या गळ्यात बांधायचे तरी कसे? नुसत्या विचाराने शेतकऱ्याच्या बायकोला मनातून गलबलून आले. शेवटी तिने एक मोठा निर्णय घेतला. आपल्या मुलीला कधीही घराबाहेर काढायचेच नाही, जेणेकरून ती कधी त्या बेडकाच्या दृष्टीस पडणार नाही. ती बाहेरच पडली नाही, तर बेडकाचा आपल्या मुलीशी विवाह करण्याचा प्रश्नच येणार नाही.

मुलीच्या जन्मापासूनच शेतकऱ्याची बायको तिला जीवापाड जपू लागली. तिला एक क्षणही ती आपल्या नजरेपासून दूर जाऊ देत नसे, तिला कायम घरातच ठेवत असे. मुलगी बिचारी बाहेर जाण्यासाठी खूप हट्ट करत असे, पण बेडकाच्या भीतीमुळे आई तिला घरातून एक पाऊलही बाहेर काढू देत नव्हती.

शेतकऱ्याची मुलगी आता बारा वर्षांची झाली होती. एके दिवशी शेतकऱ्याची बायको कपडे धुण्यासाठी नदीवर निघाली. जाताना तिने नेहमीप्रमाणे मुलीला कडक ताकीद दिली, "हे बघ बाळा, मी पटकन जाऊन नदीवर कपडे धुऊन येते. बाबा शेतावरून येतीलच इतक्यात. तोपर्यंत तू घरातच राहा, बाहेर कुठेही जाऊ नकोस. ठीक आहे ना? शेतकऱ्याची बायको कपडे घेऊन नदीवर गेली. हीच संधी साधून आज काहीही झाले तरी आपण घराबाहेर पडायचेच, असे मुलीने मनाशी पक्के ठरवले. आई बाहेर पडताच हळूच तीही घराबाहेर पडली. आईच्या मागे मागे ती लपतछपत जाऊ लागली. बघता बघता आईसोबत तीही नदीवर पोहोचली. आई पाण्यात कपडे धुण्यासाठी उतरणार, एवढ्यात तिने पाठीमागून आईला हाक मारली, "आई, मी आले!" आईने मागे वळून मुलीला बघितले मात्र, तिच्या छातीत एकदम धडधडायलाच लागले. कारण ही तीच नदी होती, जिच्या काठी दोडक्याचा वेल होता. त्याच वेलीवरून तिच्या नवऱ्याने दोडकी नेताना बेडकाची ती कठीण अट मान्य केली होती आणि तो बेडूकसुद्धा याच नदीत राहत होता.

आई लगबगीने मुलीच्या जवळ गेली आणि म्हणाली, "बाळा, मी तुला घराबाहेर पडू नको म्हणून सांगितले होते ना? तरीसुद्धा तू आलीस, तीही या नदीवर? आता आलीस ती आलीस, पण इथे नदीच्या किनारी या दगडावरच शांत बसून राहा. काहीही झाले तरी नदीच्या पाण्यात अजिबात उतरायचे नाही. मी पटकन कपडे धुऊन घेते, मग आपण दोघी मिळून घरी जाऊ." शहाण्या मुलीने आईचे म्हणणे ऐकले. ती शांतपणे आईने सांगितलेल्या त्या दगडावर बसून राहिली.

आज पहिल्यांदाच ती घराबाहेर पडली होती, नदीकाठी आली होती. ती नदीकाठचा सुंदर आणि निसर्गरम्य परिसर न्याहाळत होती. उंच उंच डोंगररांगा दिसत होत्या. त्या डोंगररांगांमधून उगम पावणारी नदी आपले निळेशार पाणी घेऊन खळखळत वाहत होती. पाण्याचा तो सुंदर खळखळाट आणि पक्ष्यांचा मधुर चिवचिवाट यामुळे पूर्ण वातावरण अत्यंत प्रसन्न वाटत होते.

मुलगी नदीच्या त्या वाहत्या पाण्याकडे बघताना पूर्णपणे हरखून गेली होती. एवढ्यातच तिला नदीच्या अगदी काठाशी एक अतिशय सुंदर कमळ दिसले. गुलाबी रंगाचे, शंभर पाकळ्या असलेले सुंदर असे मोठे कमळ तिथे उमलले होते. ते कमळ मुलीच्या अगदी हाताजवळच होते. ते कमळ काढायला तिला पाण्यात उतरण्याची काहीही गरज नव्हती. तिने हात जरा लांब केला, तरी ते सहज हाताला लागले असते. कमळ काढावे म्हणून तिने हात लांब केला. कमळ अगदी हाताच्या जवळ होते, फक्त ते हातात मिळण्यासाठी काही अंतराचीच गरज होती. मुलगी दगडावरून उठली आणि तिने आपला हात अजून लांब केला. अजूनही थोड्याशा अंतराची गरज वाटत होती. तिने अजून जरा हात लांब केला, पण छे, कमळ आणि तिचा हात याच्यामध्ये थोडे अंतर राहिलेच. मुलीने चार पावले पुढे चालून कमळाला हात लावण्याचा प्रयत्न केला. अरेच्या, तरीही ते अंतर काही मिटेना! तिने अजून हात लांब केला, पण अंतर जशास तसे राहिले. बघता बघता मुलगी नदीच्या पाण्यात उतरली, तर कमळ अजून थोडे पुढे सरकले. थोडेसे तर अंतर आहे, अजून दोन पावले टाकली तर आपल्याला ते कमळ नक्की मिळेल, या आशेने मुलगी पाण्यात अजून पुढे गेली. पावलापर्यंत असलेले नदीचे पाणी आता तिच्या गुडघ्यापर्यंत आले. पण तरीही कमळ आणि तिच्यामधले ते थोडेसे अंतर काही केल्या मिटत नव्हते. गुडघ्यापर्यंतचे पाणी आता कमरेपर्यंत आले, तरीही अंतर तसेच राहिले. ते कमळ अगदी हाताला लागेल लागेल असेच वाटायचे, त्यामुळे ती अजून पुढे जाऊन कमळ काढण्याचा प्रयत्न करायची. बघता बघता पाणी थेट तिच्या गळ्यापर्यंत आले. आता मात्र मुलगी मनातून खूप घाबरली. आपण या नदीच्या पाण्यात बुडतो की काय, अशी भयंकर भीती तिला वाटू लागली. तिने जीवाच्या आकांताने 'आई' अशी मोठ्याने हाक मारली. कपडे धुण्यात मग्न असलेल्या आईचे लक्ष मुलीच्या हाकेसरशी आवाजाच्या दिशेने गेले. बघते तर काय, आपली मुलगी नदीच्या मध्यभागी उभी आहे आणि नदीचे पाणी थेट तिच्या गळ्यापर्यंत आले आहे!

आईने हातातले कपडे तिथेच टाकले आणि ती मुलीला पकडण्यासाठी पाण्यात धावू लागली. पण आई जशी जशी पुढे जायची, मुलगी तशी तशी अजून नदीच्या खोल पाण्यात सरकल्यासारखी वाटायची. त्यामुळे आई भीतीने तिथेच थबकली. मुलीला मोठ्याने हाक मारत तिने विचारले, "बाळा, तू नदीच्या इतक्या खोल पाण्यापर्यंत कशी पोहोचलीस? ये मागे लवकर!"

"आई, हे बघ माझ्याजवळ असलेले हे कमळ मला इथवर घेऊन आले. सुरुवातीला ते अगदी काठाशी होते, म्हणून मी ते कमळ काढायला गेले. जशी मी कमळ काढण्यासाठी पुढे सरकायची, हे कमळ अजून पुढे पाण्यात जायचे. पण ते माझ्या काही लक्षात आलेच नाही. पाणी गळ्याशी आल्यावर आता मला समजले की मी नदीच्या मध्यभागी पोहोचले आहे. आई, मला वाचव!" मुलगी हुंदके देत रडू लागली. आईचे सख्खे काळीज कळवळून गेले. मुलीला वाचवण्यासाठी ती पुन्हा पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागली, इतक्यात तिला तिथे मोठमोठ्याने कोणीतरी हसत असल्याचा भास झाला. नंतर तिच्या नीट लक्षात आले की तो केवळ भास नसून खरोखरच कोणीतरी तिथे हसत आहे. तिला लगेच समजले की हा कोण हसतोय ते!

ती ओरडून म्हणाली, "बेडूक दादा, मला माहीत आहे तुम्ही हसत आहात. कृपा करून माझ्या लहान मुलीला सोडा!"

तिचे ते बोलणे ऐकून हसण्याचा आवाज अजूनच वाढला. त्या मागोमाग तिच्या कानावर कडक शब्द पडले, "तुझ्या नवऱ्याने मला पूर्वी वचन दिले होते की मुलगी झाली तर तिचे लग्न माझ्याशी करून देणार! पण तुम्ही तुमचे दिलेले वचन पाळले नाही, म्हणून मला आज अशी युक्ती करावी लागली. आता काही मी तुमच्या या मुलीला माघारी पाठवणार नाही. मी तिला अशीच नदीत घेऊन जाईन आणि तिच्याशी लग्न करीन, आणि तुमचा जावई होऊनच दाखवीन!" पुन्हा एकदा त्या बेडकाच्या अक्राळविक्राळ हसण्याचा आवाज आला आणि हळूच तो आवाज पाण्यात विरून गेला. त्या आवाजाबरोबर पाण्याच्या मध्यभागी उभी असलेली तिची लाडकी मुलगीही एकदम दिसेनाशी झाली.

फक्त एकच दिवस नजर चुकवून मुलगी आईसोबत नदीकाठी आली आणि बेडकाने नेमका आपला डाव साधला. इतके दिवस शेतकऱ्याने व त्याच्या बायकोने आपल्या मुलीचे त्या बेडकापासून रक्षण केले होते, मुलीला घरात खूप जपून ठेवले होते. यासाठी त्या दोघांना आजवर खूप कष्ट घ्यावे लागले होते, पण आज ते सारे कष्ट मुलीसोबत त्या नदीच्या पाण्यात वाहून गेले. शेतकऱ्याची बायको दुःखी कष्टी होऊन रडत रडत माघारी परतली.   क्रमशः


गाैतमी चाेर्लेकर गावस