प्रत्येकाने आपल्या वाढदिवशी जितके आपले वय, तितकी झाडे लावावीत आणि वाढत्या वयात जशी आपण स्वतःची काळजी घेतो, तशी त्या झाडांचीही ती मुळ धरेपर्यंत काळजी घ्यावी.

जगभरात ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला गेला. पर्यावरण दिवस साजरा केला म्हणजे आपण नेमके काय केले? तुम्ही म्हणाल, आम्ही वृक्षारोपण केले. ते तर आपण ५ जून रोजी वर्षानुवर्षे करतो. पण यामुळे वातावरणात काही सकारात्मक बदल घडल्याचे दिसून आले आहे का? ऐन पावसाळ्यात जाणवणारा असह्य उकाडा पाहता या प्रश्नाचे उत्तर 'नाही' हेच आहे. अशा परिस्थितीत पर्यावरण दिवसाच्या शुभेच्छांची देवाणघेवाण करून आपण स्वतःलाच फसवत आहोत, असे तुम्हाला नाही का वाटत?
वाढते प्रदूषण आणि त्यामुळे होणारे ऋतुचक्रातील बदल ही मानवनिर्मित संकटे सर्वश्रुत आहेत. ऐन पावसाळ्यात जाणवणारा असह्य उकाडा ही माणसाने स्वतःवरच ओढवून घेतलेली परिस्थिती आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तंत्रज्ञानाची प्रगती मिरवणारा एकविसाव्या शतकातील माणूस गगनात उंच भरारी घ्यायला शिकला खरा; पण दुर्दैवाने जिच्या आधारे त्याने आकाशात झेप घेतली, त्या मातृरूपी पृथ्वीलाच तो विसरला. एखादा सुशिक्षित माणूस जेव्हा वातानुकूलित वाहनातून कचऱ्याची पिशवी नदीच्या पाण्यात फेकून देतो, तेव्हा आपण प्रगतीच्या मार्गावर चाललो आहोत की अधोगतीच्या, असा प्रश्न उपस्थित होतो.
कमी वयात जडणारे आजार, बिघडणारे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य, अचानक डोके वर काढणाऱ्या महामारी, माणसाचे घटत चाललेले आयुर्मान यांसारख्या अडचणी 'मानव-वन्यजीव सहअस्तित्व' टिकवून ठेवण्याची गरज अधोरेखित करतात.
माणसाने आरंभलेल्या पर्यावरणाच्या ऱ्हासाची गती पाहता, ते पुनर्जीवित करण्यासाठी फक्त एक दिवस पुरेल का? वन्यजीवांचा जो अधिवास माणसाने अधाशाप्रमाणे नष्ट केला आहे, निसर्गाचा प्रत्येक हिस्सा ज्या लालसेने ओरबाडला आहे, तो फक्त एकच दिवस पर्यावरण दिवस साजरा केल्याने पुनर्जीवित होणे शक्य आहे का? जे नष्ट केले ते जरी आपण बदलू शकत नसलो, तरी जे नष्ट केले ते निरंतर प्रयत्नांअंती आपण पुन्हा उभे करू शकतो. प्रत्येक व्यक्तीने पर्यावरणाप्रती आपली जबाबदारी ओळखून वागल्यास हे शक्य आहे.
तर, आपली जबाबदारी काय? प्लास्टिकचा वापर टाळा; कारण पृथ्वीचे फुफ्फुस निकामी करण्याचे काम प्लास्टिक करते. दिवस-रात्र वातानुकूलित यंत्रणांचा वापर करू नका; कारण त्यांचा अनावश्यक वापर पर्यावरणावर अतिरिक्त ताण निर्माण करतो. वन्यजीवांशी संघर्ष टाळा; कारण वन्यजीव पृथ्वीचे पर्यावरणीय संतुलन टिकवून ठेवतात. रसायनांचा अतिरेकी वापर टाळा; कारण तो जमीन नापीक बनवतो. पाणी दूषित करणे, त्यात आक्रमक प्रजाती सोडणे किंवा पर्यावरणाला हानी पोहोचवणारे उपद्व्याप करणे टाळा; कारण प्रदूषण पृथ्वीला आजारी बनवते.
आजच्या घडीला पर्यावरणाचे आणि पर्यायाने स्वतःच्या अस्तित्वाचे रक्षण करण्यासाठी माणसाला वर्षाचे बाराही महिने पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने वाटचाल करणे अनिवार्य आहे. पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून झाडे लावणाऱ्या, समुद्रकिनारे आणि समुद्राच्या तळातील घाण साफ करणाऱ्या लोकांची कामगिरी कौतुकास्पद आहेच; पण पर्यावरणाचे रक्षण करणे हे फक्त प्रशासन किंवा पर्यावरणप्रेमींचे कर्तव्य नसून प्रत्येक नागरिकाने या कामात आपले योगदान देणे गरजेचे आहे.
आधुनिकीकरण, शहरीकरण आणि औद्योगिकीकरण यांसारख्या कारणांमुळे जैवविविधता चित्त्याच्या वेगाने नष्ट होत चालली आहे. अशा वेळी कासवाच्या गतीने उचललेली पावले पर्यावरणाचे संरक्षण करू शकतील का? पर्यावरणीय बदलांमुळे अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांची परिभाषाही बदलत चालली आहे. मानवजातीला मूल्यांची जोड देणारी संस्कृती आणि संस्कारदेखील हळूहळू नष्ट होत चालले आहेत.
या पर्यावरण दिनी आपण एक उपक्रम राबवण्याचे निश्चित करूया. उपक्रम अतिशय सोपा आहे. प्रत्येकाने आपल्या वाढदिवशी जितके आपले वय, तितकी झाडे लावावीत आणि वाढत्या वयात जशी आपण स्वतःची काळजी घेतो, तशी त्या झाडांचीही ती मुळ धरेपर्यंत काळजी घ्यावी.
पर्यावरण दिवस साजरा करावा; पण उर्वरित दिवसांतही तो त्याच जिद्दीने जपायला शिकावे. सहकारीवर्ग, कुटुंबीय आणि विशेषतः लहान मुलांना निसर्ग वाचायला शिकवले पाहिजे. कारण मुलांना जर आज निसर्ग वाचायला शिकवले, तर पुढे जाऊन त्यांना तो नव्याने वाचवायला शिकवण्याची गरज भासणार नाही.
स्त्रिग्धरा नाईक (लेखिका इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे)