वाळू उपसा करणाऱ्या अनधिकृत बोटी जप्त करा!

उत्तर गोवा जिल्हाधिकारी अंकित यादव यांचे निर्देश


16 mins ago
वाळू उपसा करणाऱ्या अनधिकृत बोटी जप्त करा!

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : नद्यांमधून बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या अनधिकृत बोटी तातडीने जप्त करा, असे आदेश उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी संबंधित विभागांना दिले आहेत. महसूल, खाण, पोलीस आणि कॅप्टन ऑफ पोर्ट या विभागांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
बेकायदा वाळू उपसा रोखण्यासाठी प्रत्येक तालुक्यात संयुक्त तपास पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांमध्ये मामलेदार, तलाठी आणि पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. पेडणे, डिचोली आणि बार्देश तालुक्यांत बेकायदा वाळू उपशाच्या तक्रारी वाढल्याने नदी परिसरात आकस्मिक तपासणी करण्यात येणार आहे.
नोंदणी नसलेल्या बोटी जप्त करण्याबरोबरच बेकायदा वाळूही जप्त करून गुन्हे नोंदवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आमोणा, वळवई, किरणपाणी आणि न्हयबाग परिसरात पूर्वी मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याची नोंद आहे.
नद्यांमध्ये बेकायदा उपसा रोखण्यासाठी गस्ती बोटीची आवश्यकता असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. नदी गस्तीसाठी आवश्यक व्यवस्था करण्याच्या सूचना कॅप्टन ऑफ पोर्ट आणि सागरी पोलीस विभागाला देण्यात आल्या आहेत.
कायदेशीर प्रक्रियेमुळे अडथळे
मांडवी आणि जुवारी नद्यांमधून वाळू उपशासाठी मंजुरी देण्याची प्रक्रिया सुरू असली तरी सीआरझेड परवानगी आणि राष्ट्रीय हरित लवादातील प्रकरण प्रलंबित असल्याने अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे राज्यात वाळूची कमतरता भासत असून बांधकाम व्यावसायिकांना इतर राज्यांतून वाळू मागवावी लागत आहे.