चेन्नईचा ‘फ्लॉप शो’ खंडित होणार का?

Story: क्रीडारंग |
06th April, 11:16 pm
चेन्नईचा ‘फ्लॉप शो’ खंडित होणार का?

चेन्नई सुपरकिंग्ज हा आयपीएलमधील सर्वांत यशस्वी आणि लोकप्रिय संघांपैकी एक मानला जातो. मात्र, २०२६ च्या हंगामाची सुरुवात या संघासाठी अत्यंत निराशाजनक ठरली आहे. सुरुवातीचे सलग तीन सामने गमावल्यामुळे संघावर दबाव वाढला असून चाहत्यांमध्येही चिंता निर्माण झाली आहे.

संघात ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन यांसारखे स्टार खेळाडू असतानाही चेन्नईचा खेळ इतर संघांच्या तुलनेत फिका दिसत आहे. क्रिकेट तज्ज्ञांच्या मते, या अपयशामागे अनेक कारणांचा संगम दिसून येतो. चेन्नई सुपर किंग्जची सर्वात मोठी समस्या म्हणजे त्यांचे सलामीवीर सातत्याने मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरत आहेत. ऋतुराज आणि संजूकडून तिनही सामन्यात अपेक्षित सुरुवात मिळाली नसल्यामुळे मधल्या फळीवर अतिरिक्त दबाव येत आहे. क्रिकेट विश्लेषकांच्या मते, चेन्नईची फलंदाजी कागदावर मजबूत दिसते, पण मैदानावर ती एकसंध युनिट म्हणून काम करत नाही. आतापर्यंत आयुष म्हात्रे या नवोदित खेळाडूने आपल्या फलंदाजीने छाप सोडली आहे. बाकी फलंदाज अपयशी ठरले आहेत. संघाच्या पराभवामागील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मधल्या फळीचे अपयश. टॉप ऑर्डर अपयशी ठरल्यास मधल्या फळीतील खेळाडूंनी जबाबदारी घ्यावी लागते, पण चेन्नईच्या बाबतीत हे दिसत नाही.

चेन्नई सुपर किंग्जची ओळख नेहमीच संतुलित गोलंदाजीसाठी होती. मात्र, या हंगामात गोलंदाज अपेक्षित कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहेत. विशेषतः शेवटच्या ५ षटकांत जास्त धावा देणे हा पराभवाचा मोठा घटक ठरला आहे. तज्ज्ञांच्या मते, चेन्नईचे गोलंदाज निर्णायक क्षणी दबावाखाली येतात.

संघ व्यवस्थापनाच्या काही निर्णयांवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. प्लेइंग इलेव्हनमध्ये सातत्याने बदल, योग्य संयोजन न सापडणे आणि सामन्यादरम्यान घेतलेले निर्णय यामुळे संघाला फटका बसत आहे.

चेन्नईसारख्या संघाला जिंकण्यासाठी केवळ अनुभव पुरेसा नसून सातत्यपूर्ण आणि आधुनिक क्रिकेट खेळणे गरजेचे आहे. सलग तीन पराभवानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी संघाच्या निवडीवर टीका केली, तर काहींनी खेळाडूंना पाठिंबा दिला. तथापि, अनुभवी संघ असल्यामुळे पुनरागमनाची अपेक्षा अजूनही कायम आहे. चेन्नई सुपर किंग्जसाठी आता पुढील सामने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी संघाला लवकरच विजयाच्या मार्गावर परतावे लागेल. हा अनुभवी संघ दबावातून बाहेर पडून आपल्या चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करतो की नाही, हे येणारा काळच सांगेल.

- प्रवीण साठे