अमेरिका नावाचा ‘युधिष्ठिर’ आणि ट्रम्परूपी ‘दुर्योधन’!

या युद्धातून भारताला शिकण्यासारखे खूप काही आहे. आपली तेल आणि वायू साठ्याची क्षमता विकसित करणे, कठीण प्रसंगी देशात राजकीय आणि सार्वजनिक स्थैर्य राखणे यावर काम करणे गरजेचे आहे.

Story: विचारचक्र |
02nd April, 11:49 pm
अमेरिका नावाचा ‘युधिष्ठिर’ आणि ट्रम्परूपी ‘दुर्योधन’!

युधिष्ठिर हा ज्येष्ठ पांडव धर्माने वागणारा होता, पण त्याला द्यूत अर्थात जुगाराचा नाद होता आणि कोणी तसा प्रस्ताव दिल्यास तो प्रस्ताव स्वीकारण्याचा मोह त्याला आवरत नव्हता. धर्माने वागणारा होता म्हणून त्याला ‘धर्मराज’ हे नाव मिळाले. त्याच्या अगदी उलट दुर्योधन होता. मूळ नाव सुयोधन, पण त्याच्या ठायी असलेल्या दुर्गुणांमुळे त्याचे व्यक्तिचित्रण ‘दुर्योधन’ असे झाले. आज या दोन पौराणिक पात्रांची आठवण करून देण्याचे कारण म्हणजे अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण हे त्रिकोण युद्ध आणि त्याला अरबी व आखाती देश हा असलेला चौथा कोन. 

यात सर्वात बलवान आणि सर्वशक्तिमान असा कोणता घटक असेल, तर तो आहे अमेरिका. अमेरिकेला युधिष्ठिराप्रमाणे युद्धाची विलक्षण ओढ आहे. युद्ध म्हटले की, अमेरिकेतील सर्वात प्रबळ अशा ज्यू गटाच्या आहारी गेलेल्या कोणत्याही अमेरिकन अध्यक्षाचे डोळे चमकल्याशिवाय राहत नाहीत आणि एकदा युद्धाचे वेड डोक्यात भरले की, युद्ध केल्याशिवाय अमेरिका गप्प बसत नाही. व्हिएतनाम ते इराण व्हाया इराक, अफगाणिस्तान, क्युबा, मेक्सिको अशा सर्व ठिकाणी युद्ध करून अमेरिकेला सपशेल हार किंवा माघार पत्करावी लागलेली आहे, हा आजवरचा इतिहास आहे. 

कोणीतरी आपले सम्राटपद काढून घेईल की काय, पांडव आपल्याला सत्ताच्युत करून आपल्या हातातून राजगादी हिसकावून घेतील की काय; अशा‌ भीतीच्या छायेखाली राजा दुर्योधन नेहमी दडपलेला असायचा. अमेरिकेची तीच परिस्थिती आहे. सोव्हिएत रशिया असताना अमेरिकेला त्यांची भीती होती, तर आता चीन व रशिया या दोघांचीही भीती आहे. या अनाठायी भीती व दडपणातून अमेरिका जगात सर्व ठिकाणी नाक खुपसत असते. आपले वर्चस्व व आपला दबदबा जागतिक पातळीवर कायम राखण्यासाठी अमेरिकेला जगात कुठे ना कुठे तरी युद्ध सुरू ठेवावेच लागते; पण हे वर्चस्व राखण्याच्या नादात दरवेळी अमेरिकेची हाराकिरी होते, हा भूतकाळ लक्षात घेणे आवश्यक आहे. ज्यू लॉबीचा दबाव, युद्ध उद्योगांचा दबाव, जागतिक महासत्ता म्हणून वर्चस्व राखण्याचा अंतर्बाह्य दबाव या सर्व कारणांमुळे युद्धात पडणारी अमेरिका ‘युद्धखोर देश’ म्हणून नेहमी सिद्ध झाली आहे. 

अमेरिकेने व्हिएतनाम जिंकण्यासाठी जंगजंग पछाडले, पण शेवटी पदरी निराशा आणि पराभवच आला. रासायनिक अस्त्रे आहेत, असा प्रचार करून इराकवर हल्ला केला; पण इराक युद्धात सद्दाम हुसेनला संपवण्याशिवाय काहीही हाती लागले नाही. २००० ते २०२१ ही वीस वर्षे अमेरिकेने अफगाणिस्तान ताब्यात ठेवण्यात वाया घालवली आणि २०२१ साली जेव्हा अमेरिकेने अफगाणिस्तानमधून काढता पाय घेतला, त्यानंतर तालिबानने रक्ताचा थेंबही न सांडता परत अफगाणिस्तान ताब्यात घेतले. अमेरिकेतील ज्यू लॉबी व अमेरिकेचे  ५१ वे राज्य म्हणजेच इस्रायल, या दोघांच्या आहारी जाऊन अमेरिका या कधीही न संपणाऱ्या युद्धात उतरली आहे. 

युद्ध छेडणाऱ्या कोणत्याही देशाला युद्ध सुरू करत येते, पण थांबवता येत नाही. याचे कारण युद्ध कोणत्या वळणावर गेले पाहिजे आणि कुठे थांबले पाहिजे याचा मुत्सद्देगिरीने आणि दूरदृष्टीने एकूण विचार केलेला नसतो‌. म्हणून नाचक्की करून न घेता स्वतःला अलगद युद्धातून बाजूला कसे करावे, हा यक्षप्रश्न असतो. रशिया व अमेरिका यांची सध्याची परिस्थिती हीच अवस्था दर्शवते. रशियाने युक्रेनविरुद्धच्या युद्धात आपले हात पोळून घेतले आणि या युद्धातून बाहेर कसे पडावे या विवंचनेत तो देश आहे. या युद्धात अमेरिकेला अनपेक्षित अशी घडलेली घटना म्हणजे आपला सुडाग्नी शांत करण्यासाठी इराणने अनेक आखाती देशांवर हल्ले चढवले आणि त्याचा परिणाम तेलाच्या किमतीवर झाला. 

अमेरिका व इस्रायल या दोन्ही देशांना स्वप्नातही वाटले नव्हते की इराण हे असले काहीतरी करेल. इराणने जागतिक तेलाच्या बाजारपेठेत अस्थैर्य आणण्यासाठी या आखाती देशांवर हल्ले केले. इराणने उद्ध्वस्त केलेला कतारचा गॅस प्रकल्प दुरुस्त होण्यासाठी तर पुढची अनेक वर्षे जातील, असा अंदाज व्यक्त होत आहे. आपला अहंकार, हेका, हेकेखोर वृत्ती, बेताल वक्तव्ये आणि बेभरवशाच्या कृतींवर प्रचंड विश्वास असलेला एक ‘विचित्र गृहस्थ’ जगातील सर्वात जुन्या लोकशाहीचे प्रतिनिधित्व करतोय, ही गोष्ट अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात दुर्दैवी आहे. जगातील अनेक राजकीय व भूराजकीय तज्ज्ञ तसेच आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक या ‘ट्रम्प प्रवृत्ती’ला आणि एकूणच वागणुकीला ‘मॅड मॅन्स थिअरी’ असे संबोधतात. आपण प्रचंड गोंधळलेले आहोत व आपण ठामपणे काही करू शकत नाही असे शत्रूला दाखवणे आणि अनपेक्षितपणे काही निर्णय घेणे म्हणजे ‘मॅड मॅन्स थिअरी’ होय.

दुर्योधनासारखाच हट्टी, उद्धट, हेकेखोर, आततायी व स्वार्थी असलेला हा ‘विचित्र गृहस्थ’ अमेरिकेचे राजकारण रसातळाला घेऊन गेला आहे, असे म्हणायला हरकत नाही. या युद्धातून भारताला शिकण्यासारखे खूप काही आहे. आपली तेल आणि वायू साठ्याची क्षमता विकसित करणे, कठीण प्रसंगी देशात राजकीय आणि सार्वजनिक स्थैर्य राखणे यावर काम करणे गरजेचे आहे. कदाचित येत्या दोन आठवड्यात हे युद्ध थांबेलही, पण अमेरिकेची ‘युद्ध’ नावाच्या जुगाराची खुमखुमी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची दुर्योधनी वृत्ती जाईल का, हा प्रश्नच आहे. या शतकातही अमेरिकेची जागतिक राजकारणात ‘नैतिक पोलिसगिरी’ कायम असेल, यात शंका नाही. अमेरिका नावाचा ‘युधिष्ठिर’ आणि ट्रम्परूपी ‘दुर्योधन’ पश्चिम आशियाला तूर्तास तरी छळत राहणार, हे नक्की.


- प्रा. विघ्नेश शिरगुरकर

(लेखक कथालेखक, अनुवादक 

आणि कवी आहेत.)