प्राध्यापकाचा विवाहप्रस्ताव; विद्यार्थिनीचा रौद्रावतार

Story: राज्यरंग |
02nd April, 11:44 pm
प्राध्यापकाचा विवाहप्रस्ताव; विद्यार्थिनीचा रौद्रावतार

प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलांनंतर सर्वाधिक मानाचे स्थान असते ते शिक्षकांचे. अक्षरांची ओळख, गणिताची आकडेमोड शिक्षकांमुळेच कळत असते. अनेक शिक्षकांनी हाल-अपेष्टा सहन करून आदर्श विद्यार्थी घडवले आहेत. शिक्षकांमध्ये बहुतेक जण आदर्शवादी असले तरी आज-काल काही शिक्षकांनी मनमानी, गैरवर्तनामुळे शिक्षकी पेशालाच बट्टा लावण्याचे काम केले आहे. काही महिन्यांपूर्वीच एका शिक्षकाने दहावीची प्रश्नपत्रिका देण्याच्या बदल्यात विद्यार्थ्याकडून सोने घेतले होते. आता एका मेडिकल कॉलेजमधील साहाय्यक प्राध्यापकाने भरवर्गात एका विद्यार्थिनीला लग्नाची मागणी घातली. संतप्त विद्यार्थिनीने त्याला चपलेने मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कॉलेजने त्याला निलंबित केले असून पोलिसांनीही या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे.

बंगळुरूनजीकच्या तुमकूर येथील श्री सिद्धार्थ इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर कॉलेजमध्ये हा प्रकार घडला. अब्दुल मोहम्मद नावाच्या साहाय्यक प्राध्यापकाने वर्गाला शिकवत असतानाच एका विद्यार्थिनीला लग्नाची मागणी घातली. लेक्चर सुरू असतानाच प्राध्यापकाने अचानक आपल्या भावना व्यक्त करण्यास सुरुवात केली. हातात माईक घेऊन त्याने, ‘मला या वर्गातील एका सर्वांत महत्त्वाच्या मुलीला प्रपोज करायचे आहे’, असे म्हणत त्या विद्यार्थिनीचे थेट नाव घेतले. या कृत्यावर संबंधित विद्यार्थिनीने तत्काळ आक्षेप घेतला. त्यावरून दोघांमध्ये जोरदार शाब्दिक वादावादी झाली. प्राध्यापक म्हणाले, ‘‘तूच मला ‘आय लव्ह यू’ म्हणाली होतीस." विद्यार्थिनीने त्याचा इन्कार केला आणि ‘तुम्हाला काही बोलायचे असेल तर थेट प्राचार्यांकडे चला, संपूर्ण बॅच माझ्यासोबत येईल’, असे सांगितले. त्यावर प्राध्यापक म्हणाला, ‘‘तू मला प्रपोज केल्याचे सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाले आहे.’’ विद्यार्थिनीने फुटेज दाखवण्याची मागणी केली. वाद वाढल्यानंतर प्राध्यापक ‘उद्या बोलू’, असे म्हणून वर्गाबाहेर जाऊ लागला. मात्र, संतप्त विद्यार्थिनी आणि तिच्या वर्गमित्रांनी त्याला कॉलेजच्या आवारातच गाठले. अपमानास्पद वागणुकीमुळे संतापलेल्या विद्यार्थिनीने स्वतःच्या पायातील चपलेने प्राध्यापकाला मारहाण केली. इतर विद्यार्थ्यांनीही प्राध्यापकाला चोप दिला.

विद्यार्थ्यांनी बनवलेला व्हिडिओ समोर आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. प्राध्यापकाविरुद्ध कॉलेजचे प्राचार्य दिवाकर एस. पी. यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली असून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियातून या घटनेचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे सर्वच स्तरांतून संताप व्यक्त होत आहे. विद्यार्थी आणि पालकांतून या घटनेवरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी शिक्षकीपेशाला कलंक ठरणाऱ्या अशा वृत्तीला वेळीच लगाम घालण्यासाठी कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी होत आहे.

प्रदीप जोशी