गॅस सिलिंडरचा पुरवठा कमी झाल्यामुळे व्यवसायांवर परिणाम झाला आहे. अनेक रेस्टॉरंट्स बंद आहेत किंवा त्यांची वेळ आणि मेनूमध्ये कपात झाली आहे. या साऱ्या गोष्टींचा अर्थकारणाशी थेट संबंध असल्यामुळे हे युद्ध थांबणे अत्यंत आवश्यक आहे. ट्रम्प यांनी घेतलेली भूमिका आणि इराणकडून दिले जाणारे प्रत्युत्तर यावरून सध्या तरी युद्धाला पूर्णविराम अशक्य दिसत आहे.

इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायलचे युद्ध थांबेल असे दिसत असतानाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर आणखी भीषण हल्ले होतील, असे आपल्या भाषणात म्हटल्यामुळे नेमके ते काय भूमिका घेणार आहेत, ते कळण्यास मार्ग नाही. बुधवारी त्यांनी इराणशी सुरू असलेले युद्ध दोन आठवड्यात संपुष्टात येईल, असे म्हटले. तसे म्हणताना त्यांनी इराणला पुन्हा अश्मयुगात ढकलून देऊ, असाही इशारा दिला होता. शुक्रवारी अमेरिकेला संबोधित करताना त्यांनी इराण अणुशक्ती तयार करण्याच्या जवळ होता, त्यामुळे त्यांना रोखणे गरजेचे होते असे म्हणत, ‘इराणवर आणखी तीव्र हल्ले होतील,’ असे स्पष्ट केले. होर्मुझच्या सामुद्रधुनीत ज्या देशांचा तेल पुरवठा अडकला आहे त्यांनी तो तिथून बाहेर काढावा आणि शक्यतो अमेरिकेतून तेल खरेदी करावी, असा सल्लाही त्यांनी इतर देशांना दिला आहे. त्यांच्या भाषणानंतर तेलाच्या किमती चार टक्क्यांनी वाढल्यामुळे त्यांच्या भाषणाचा काय अर्थ बाजाराने लावला म्हणजे हे युद्ध अजून किती दिवस चालेल, त्याचा अंदाज कोणालाच आलेला नाही.
ट्रम्प यांनी बुधवारी केलेली विधाने, एक्स हँडलवर मांडलेले मत आणि गुरुवारी केलेले भाषण यात फरक आहेच, शिवाय हे युद्ध नेमके कशासाठी सुरू आहे तेही ते सांगू शकले नाहीत, असा सूर अमेरिकेतील त्यांच्या विरोधकांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या बोलण्याचा कुठलाच अर्थ सध्या जग काढू शकत नाही, अशी स्थिती आहे. म्हणजे बुधवारी त्यांनी दोन आठवड्यात हे युद्ध संपुष्टात येईल त्यासाठी इराणने कुठलाच करार करण्याची गरज नाही, असे म्हटले होते. त्यानंतर बुधवारी संध्याकाळी त्यांनी इराणने युद्ध थांबवण्याची मागणी केली आहे, मात्र होर्मुझ सामुद्रधुनी खुली केल्यानंतरच त्यावर विचार होईल. अन्यथा इराणला अश्मयुगात पुन्हा ढकलून देऊ, असा इशारा दिला होता. ट्रम्प यांची विधाने वेळोवेळी बदलत असल्यामुळे हे युद्ध थांबण्याची चिन्हे दिसत नाही. आज तर ट्रम्प यांच्या भाषणानंतर इराणने अमेरिकेला चोख प्रत्युत्तर दिले आहे. इराणने आपले हल्ले अधिक व्यापक करण्याचे तसेच भीषण करण्याचे संकेत दिले आहेत. इराणच्या लष्कराच्या प्रवक्त्याने अमेरिका-इस्रायलचे हल्ले नगण्य असून त्यांच्याकडे तेहरानच्या लष्करी क्षमतेबाबत आणि शस्त्रसामग्रीबाबत योग्य माहिती नाही, असे म्हणत अमेरिकेला भीषण हल्ल्याचे इशारे दिले आहेत. ट्रम्प यांच्यावर अमेरिकेतील नागरिक युद्ध थांबवण्यासाठी दबाव टाकत असताना ते गुरुवारी निर्णायक भूमिका घेतील, अशी शक्यता होती. त्यांच्या भाषणातून तसा दिलासा मिळाला नाही; उलट अमेरिका आणि इराण युद्धाच्या नशेत असल्याचेच दिसत आहे. याचे परिणाम म्हणून तेलाच्या किमती वाढतीलच, शिवाय अनेक देशांना कच्चे तेल, गॅसचा पुरवठा कमी होणार आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणावाचा भारतासह जपान, चीन, दक्षिण कोरिया, जर्मनी, इटली आणि फ्रान्स या देशांवर गंभीर परिणाम होत आहेत. हे देश मध्यपूर्वेतील देशांमधून तेल, गॅस आयात करतात त्यामुळे त्यांच्यावर गंभीर परिणाम होतील. शिवाय मध्यपूर्वेतील जे देश या देशांना तेलसाठा निर्यात करतात, त्यांचीही आर्थिक गणिते बिघडतील.
गेले ३३ दिवस सुरू असलेल्या या युद्धाचे विपरीत परिणाम सध्या जगभरात दिसत आहेत. विशेष करून जे देश मध्यपूर्वेतून कच्चे तेल मागवतात, त्या देशांना झळ पोहोचली आहे. भारताची स्थिती आताच गंभीर आहे. हे युद्ध सुरू राहिले आणि त्याने विदारक स्वरूप घेतले, तर भविष्यात भीषण परिणामांना सामोरे जाण्याची वेळ भारतावरही येऊ शकते. आताच गॅस सिलिंडर आणि तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झालेले आहेत. केरोसीन उपलब्ध करून देण्याची वेळ आली आहे. गॅस सिलिंडरचा पुरवठा कमी झाल्यामुळे व्यवसायांवर परिणाम झाला आहे. अनेक रेस्टॉरंट्स बंद आहेत किंवा त्यांची वेळ आणि मेनूमध्ये कपात झाली आहे. या साऱ्या गोष्टींचा अर्थकारणाशी थेट संबंध असल्यामुळे हे युद्ध थांबणे अत्यंत आवश्यक आहे. ट्रम्प यांनी घेतलेली भूमिका आणि इराणकडून दिले जाणारे प्रत्युत्तर यावरून सध्या तरी युद्धाला पूर्णविराम अशक्य दिसत आहे.