विकासाच्या मुद्द्यांऐवजी विषारी प्रचार !

ही निवडणूक एवढी प्रतिष्ठेची केली आहे की ती जिंकण्यासाठी मतदारांच्या मनात विष कालवण्याचे प्रकार सुरू आहेत. अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवले नाही आणि खोट्या गोष्टी पसरवणाऱ्यांवर कारवाई केली नाही, तर यापुढे निवडणुका अशाच मार्गाने जिंकण्यासाठी उमेदवार आणि राजकीय नेते प्रयत्न करतील.

Story: संपादकीय |
30th March, 11:24 pm
विकासाच्या मुद्द्यांऐवजी विषारी प्रचार !

फोंडा पोटनिवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या उमेदवारांनी घरोघरी भेटी देण्यावर आणि फोंडावासीयांना आश्वासने देण्यावर भर दिला आहे. पक्ष सत्तेत असल्यामुळे भाजपचे उमेदवार रितेश रवी नाईक लोकांना देत असलेली आश्वासने इतर उमेदवारांपेक्षा जास्त आहेत. फोंड्याला स्मार्ट सिटी करण्यापासून ते उपजिल्हा इस्पितळाला जिल्हा इस्पितळाचा दर्जा देण्यापर्यंतची अनेक आश्वासने भाजपचे नेते फोंड्यात येऊन देत आहेत. सरकार असल्यामुळे त्यांना अशी आश्वासने देण्यात काही अडथळे नाहीत. किंबहुना फोंड्यातील मतदारांच्या मनात काय चालले आहे, त्याची कुणकुण लागल्यामुळेही भाजपचे नेते तिथे जाऊन वेगवेगळी आश्वासने देत असावेत. दुसऱ्या बाजूने काँग्रेसचे उमेदवार केतन भाटीकर स्थानिक देवतांचे दर्शन घेण्यापासून ते मतदारांना भाजपला मत न देता काँग्रेसला का द्यावे, त्याविषयी ठासून सांगत आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसने आतापर्यंत कोणी मोठे नेते फोंड्याच्या पोटनिवडणुकीसाठी बोलावलेले नाहीत. प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर वगळता काँग्रेसचे इतर नेतेही तिथे फारसे दिसत नाहीत. आपचे उमेदवार गीतेश नाईक हेही एकच संधी आपल्याला द्या, असे सांगत घरोघरी फिरत आहेत. फोंड्यात दुरंगीच लढत होईल असे दिसत असले तरी गीतेश नाईक हे काँग्रेस-भाजप यांच्या लढतीतील अडथळा ठरू शकतात, अशीही शक्यता आहे. कारण २०२२ च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार रवी नाईक हे केवळ ७७ मतांनी विजयी झाले होते. त्यानंतर तिथे मतदारयाद्यांच्या विशेष पडताळणीत फोंड्यातील सुमारे ४२०० मते घटली आहेत. त्यामुळे पोटनिवडणुकीचा निकाल काय लागेल, याचे अंदाज बांधण्याचे धाडस सध्या कोणी करत नाही. मात्र, या पोटनिवडणुकीत सध्या हीन पातळीवर काही जणांकडून अपप्रचार सुरू आहे. एकमेकांची बदनामी करतानाच लोकांमध्ये चुकीच्या बातम्या पसरवणे, बनावट बातम्यांची कात्रणे तयार करून ती प्रसारित करणे, जाती-धर्माच्या विषयांवरून लोकांमध्ये फूट पाडण्याचे प्रकार सुरू आहेत. एका पोटनिवडणुकीत इतका विषारी प्रचार होत असल्याचे पहिल्यांदाच दिसत आहे. यावरून राजकीय पक्षांमध्ये ही जागा जिंकण्यासाठी किती कसरत सुरू आहे, तेही स्पष्ट दिसते.

काँग्रेसचे उमेदवार केतन भाटीकर यांनी विशिष्ट धर्मीयांना आश्वासन दिल्याची बोगस बातमी तयार करून पसरवली जात आहे. भाजपचे मुख्य पदाधिकारी ही बातमी शेअर करत आहेत. ती बातमी खोटी असल्याचे स्पष्ट केल्यानंतरही भाजपच्या नेत्यांकडून त्या बातमीचेच भांडवल करून फोंड्यातील निवडणुकीत मतदारांच्या मनात द्वेष पेरण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हा प्रकार लोकशाहीसाठी फार घातक आहे. राजकारण बाजूला ठेवले तरी, सर्वसामान्य जनतेच्या मनात द्वेष पसरवून निवडणुका होत असतील, तर ते फार धोकादायकही आहे. गोव्यासाठी हा चुकीचा पायंडा पाडला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे निवडणूक आयोगाने या गोष्टीकडे साफ दुर्लक्ष केले आहे. एका घटनेत तर ‘गोवन वार्ता’ची बातमी दिसेल अशा प्रकारची बनावट बातमी तयार करून ती सोशल मीडियावर शेअर केली जात आहे. खोट्या बातम्यांच्या आधारे एखाद्याला बदनाम करून निवडणुका जिंकायच्या असतील, तर ही अधोगतीच आहे. 

निवडणुका विकासाच्या मुद्द्यावर व्हायला हव्यात. मतदारसंघाच्या विकासासाठी आपण काय करणार ते राजकीय पक्षांनी मतदारांना सांगायला हवे. पण जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करून छाती पुढे काढून खोट्या गोष्टींचा प्रसार करून निवडणुका लढवल्या जात आहेत. पोलीस, प्रशासन आणि निवडणूक आयोगही अशा लोकांना अडवत नाही किंवा कारवाईही करत नाही, हे त्यापेक्षा भयानक आहे. जाती-धर्मावरून लोकांमध्ये फूट घालण्यासह वैयक्तिक पातळीवर उमेदवारांकडून एकमेकांची बदनामी होत आहे. फोंड्याच्या पोटनिवडणुकीत जो उमेदवार जिंकणार आहे, तो सात-आठ महिन्यांचा आमदार ठरणार आहे. पुन्हा २०२७ मध्ये निवडणुका होतील. पण ही निवडणूक एवढी प्रतिष्ठेची केली आहे की ती जिंकण्यासाठी मतदारांच्या मनात विष कालवण्याचे प्रकार सुरू आहेत. अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवले नाही आणि खोट्या गोष्टी पसरवणाऱ्यांवर कारवाई केली नाही, तर यापुढे निवडणुका अशाच मार्गाने जिंकण्यासाठी उमेदवार आणि राजकीय नेते प्रयत्न करतील.