किनाऱ्यांवरील कुत्र्यांचा हैदोस पर्यटकांसाठी घातक

Story: अंतरंग - दक्षिण गोवा |
29th March, 08:16 pm
किनाऱ्यांवरील कुत्र्यांचा हैदोस पर्यटकांसाठी घातक

गोवा म्हटल्यानंतर पहिल्यांदा येथील निळ्याशार पाण्याचे समुद्रकिनारे डोळ्यासमोर येतात आणि तेथील शांतताही पर्यटकांना भावते. मात्र, गेल्या काही काळापासून दक्षिण गोव्यातील कोलवा, केळशी, बाणावली, माजोर्डा आणि पाळोळे यांसारख्या किनारी भागात भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या चिंतेचा विषय बनली आहे. ही केवळ एक नागरी समस्या नसून, कुत्र्यांकडून पर्यटकांवर होणारे हल्ले पर्यटनावर आणि स्थानिकांच्या सुरक्षिततेवर गंभीर परिणाम करू लागले आहेत.

उत्तर गोव्याच्या तुलनेत दक्षिण गोव्यातील किनारे शांततेसाठी ओळखले जातात. या ठिकाणी किनार्‍यालगत असलेल्या तारांकित हॉटेल्समध्ये नामांकित व्यक्ती आणि परदेशी पर्यटकांची मोठी वर्दळ असते. अनेक देशी-विदेशी पर्यटक सकाळी व संध्याकाळी फिरण्यासाठी किंवा स्नानासाठी येथे येतात. मात्र, समुद्र किनार्‍यांवर कळपाने फिरणार्‍या भटक्या कुत्र्यांमुळे आता पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नुकताच केळशी-मोबोर किनारी पाच-सहा कुत्र्यांच्या कळपाने जेम्स नामक ब्रिटिश पर्यटकावर हल्ला केला, ज्यात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. याशिवाय, अनेकदा कुत्रे पर्यटकांच्या मागे लागणे किंवा त्यांच्या सामानावर झडप घालणे अशा घटना वारंवार घडत आहेत, ज्यामुळे पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडत आहे.

केवळ पर्यटकच नव्हे, तर स्थानिक मच्छिमार, व्यावसायिक आणि शॅक मालक यांच्याकडूनही आता तक्रारी येत आहेत. किनाऱ्यावर येणार्‍या दुचाकीस्वारांच्या मागे कुत्रे लागल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तसेच, लहान मुले आणि वृद्धांना एकटे फिरणे कठीण झाले आहे. या समस्येचे मुख्य कारण म्हणजे अन्न-कचर्‍याचे चुकीचे व्यवस्थापन. किनार्‍यावरील शॅक्स आणि हॉटेल्समधील उरलेले अन्न उघड्यावर टाकले जाते, ज्यामुळे कुत्र्यांना अन्नाचा सोपा मार्ग मिळतो आणि ते त्याच ठिकाणी ठाण मांडून बसतात.   

स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्राणीमित्र संघटनांकडून नसबंदी मोहीम राबवली जाते, परंतु कुत्र्यांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत या मोहिमेचा वेग कमी पडत आहे. अनेकदा कुत्र्यांना उघड्यावर अन्न घालण्यावरून प्राणीप्रेमी आणि स्थानिक रहिवासी यांच्यात वाद होताना दिसतात. योग्य जागी अन्न न मिळाल्यास कुत्रे अधिक आक्रमक बनत असल्याचे दिसून येते. याशिवाय, भटक्या कुत्र्यांमुळे किनाऱ्यावरील कासवांच्या अंड्यांचे आणि पिल्लांचे नुकसान होण्याचा धोका असतो, जे पर्यावरणाच्या दृष्टीने घातक आहे. 

प्रशासनाने या समस्येवर कडक पावले उचलणे गरजेचे आहे. पंचायत व पालिकांना आवश्यक ती यंत्रणा उपलब्ध करून देण्याची गरज आहे, कारण सध्या जिल्हा स्तरावर या विषयाला अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नाही. किनाऱ्यावर सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणार्‍यांवर आणि कुत्रांना अन्न घालण्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची गरज आहे. दक्षिण गोव्यातील प्रत्येक पंचायतीने कुत्र्यांच्या नसबंदी आणि लसीकरणाची विशेष मोहीम राबवणे आवश्यक आहे. तसेच आक्रमक कुत्र्यांसाठी स्वतंत्र निवारा केंद्रे उभारल्यास किनार्‍यावरील गर्दी कमी होऊन कुत्र्यांचे योग्य संगोपन होईल. 

दक्षिण गोव्यातील किनाऱ्यांचे सौंदर्य आणि मानवी सुरक्षितता टिकवून ठेवण्यासाठी भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढणे ही काळाची गरज आहे. प्रशासन, नागरिक आणि प्राणी कल्याण संस्था यांनी एकत्रित प्रयत्न केल्यास चित्र नक्कीच बदलेल. यातून पर्यटक आणि स्थानिकांना सुरक्षित किनारे मिळतील आणि पर्यटनाचा आनंदही द्विगुणित होईल.

- अजय लाड