अॅपल, गुगल, मेटाला इराणची थेट धमकी

Story: विश्वरंग |
01st April, 09:39 pm
अॅपल, गुगल, मेटाला इराणची थेट धमकी

पश्चिम आशियातील युद्धाने आता अत्यंत भयानक आणि अनपेक्षित वळण घेतले असून, इराणने थेट जागतिक तंत्रज्ञान क्षेत्राला युद्धाच्या आखाड्यात ओढले आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने अॅपल, गुगल, मेटा आणि मायक्रोसॉफ्टसह १८ प्रमुख अमेरिकन तंत्रज्ञान कंपन्यांना १ एप्रिलपासून लक्ष्य करण्याचा इशारा दिला आहे. इराणच्या सर्वोच्च नेत्यांच्या 'टार्गेटेड किलिंग्ज'मध्ये या कंपन्यांच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत इराणने या कंपन्यांना 'दहशतवादी संस्था' म्हणून घोषित केले आहे.

इराणने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, बुधवार, १ एप्रिल रोजी तेहरान वेळेनुसार रात्री ८ वाजल्यापासून या कंपन्यांच्या संबंधित युनिट्सवर हल्ले सुरू केले जातील. जीवितहानी टाळण्यासाठी या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांनी आपली कार्यालये तात्काळ सोडावीत, असा इशाराही देण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर, या कंपन्यांच्या कार्यालयांच्या एक किलोमीटर परिघातील रहिवाशांनाही सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्यास सांगण्यात आले आहे. या इशाऱ्यामुळे इंटेल, एनव्हीडिया, टेस्ला आणि बोईंग यांसारख्या दिग्गज कंपन्यांच्या जागतिक कामकाजावर टांगती तलवार निर्माण झाली असून जागतिक अर्थकारणात चिंतेचे ढग दाटले आहेत.

या १८ कंपन्यांचे एकत्रित मार्केट कॅप (१८.९ ट्रिलियन डॉलर्स) हे चीनचा संपूर्ण जीडीपी (१८.५ ट्रिलियन डॉलर्स) किंवा जर्मनी, जपान, भारत आणि युनायटेड किंगडम या चार मोठ्या अर्थव्यवस्थांच्या एकत्रित जीडीपीपेक्षाही जास्त आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे आखाती देशांतील या कंपन्यांच्या हबवर यदा कदाचित हल्ला झालाच तर एकूणच 'एआय' युनिवर्स मोठ्या प्रमाणात प्रभावित होऊ शकतो. गेल्या ३१ दिवसांत इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी, कमांडर-इन-चीफ मोहम्मद पाकपूर आणि सुरक्षा प्रमुख अली लारिजानी यांचा अमेरिका-इस्रायलच्या संघर्षात मृत्यू झाला आहे. या महत्त्वाच्या व्यक्तींच्या हत्येसाठी अमेरिकन कॉर्पोरेट क्षेत्राचे तंत्रज्ञान कारणीभूत असल्याचा दावा इराणने केला आहे. दरम्यान, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधून माघार घेण्याचे संकेत दिल्याने भारतीय शेअर बाजारात १९०० अंकांची मोठी उसळी पाहायला मिळाली होती. मात्र, इराणच्या या ताज्या धमकीमुळे जागतिक स्तरावर पुन्हा एकदा अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले असून, तंत्रज्ञान क्षेत्रातील या नव्या संकटामुळे युद्धाचे स्वरूप पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


- ऋषभ एकावडे