एव्हरेस्टवर ‘बनावट रेस्क्यू’चा महाघोटाळा उघड

Story: विश्वरंग -नेपाळ |
03rd April, 11:01 pm
एव्हरेस्टवर ‘बनावट रेस्क्यू’चा महाघोटाळा उघड

जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्टच्या परिसरात एक धक्कादायक विमा घोटाळा उघडकीस आला आहे. पर्यटकांच्या अन्नात मुद्दाम बेकिंग सोडा किंवा विशिष्ट औषधे मिसळून त्यांना आजारी पाडायचे आणि त्यानंतर बनावट 'हेलिकॉप्टर रेस्क्यू' दाखवून आंतरराष्ट्रीय विमा कंपन्यांकडून कोट्यवधी रुपये उकळायचे, असा हा संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे. नेपाळ पोलिसांनी या प्रकरणी ट्रेकिंग कंपन्यांचे मालक, हेलिकॉप्टर ऑपरेटर आणि डॉक्टरांसह ३२ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

तपासातून समोर आलेली माहिती अंगावर काटा आणणारी आहे. काही भ्रष्ट शेर्पा आणि ट्रेकिंग एजन्सी पर्यटकांच्या जेवणात गुपचूप बेकिंग सोडा मिसळत असत. यामुळे पर्यटकांना तीव्र पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास सुरू व्हायचा. ही लक्षणे हुबेहूब 'अ‍ॅल्टिट्यूड सिकनेस' सारखी वाटत असल्याने पर्यटक घाबरून जायचे. काही वेळा तर डायमॉक्ससारख्या औषधांचा अतिवापर करून कृत्रिमरीत्या प्रकृती गंभीर असल्याचे भासवले जायचे.

एकदा का पर्यटक आजारी पडला की, त्याला तातडीने हेलिकॉप्टरने काठमांडूला नेण्यासाठी दबाव टाकला जायचा. एकाच हेलिकॉप्टरमध्ये अनेक रुग्णांना नेले जायचे, परंतु विमा कंपनीला प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्र उड्डाण झाल्याचे सांगून ४ हजार डॉलरच्या जागी १२ हजार डॉलरचा दावा ठोकला जायचा. रुग्णालयातील ज्येष्ठ डॉक्टरांच्या डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर करून बनावट अहवाल तयार केले जात. अनेकदा डॉक्टरला याची पुसटशी कल्पनाही नसायची. काही प्रकरणांत पर्यटक रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये बिअर पीत असताना, कागदोपत्री मात्र तो आयसीयूमध्ये भरती असल्याचे दाखवून विम्याचे पैसे लाटले गेले.

या घोटाळ्यात नेपाळ चार्टर सर्व्हिस, एव्हरेस्ट एक्स्पिरियन्स अँड असिस्टन्स आणि माऊंटन रेस्क्यू यांसारख्या मोठ्या कंपन्यांची नावे प्रामुख्याने समोर आली आहेत. नेपाळ पोलिसांच्या सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने जानेवारीपासून सुरू केलेल्या तपासात आतापर्यंत ६ अधिकाऱ्यांना अटक केली आहे. दरम्यान, हा प्रकार पहिल्यांदा २०१८ मध्ये उघडकीस आला होता. तेव्हा सरकारने ७०० पानांचा अहवाल सादर करून कडक नियमांची घोषणा केली होती. मात्र, नव्या तपासात असे दिसून आले की, हा घोटाळा थांबण्याऐवजी अधिकच विस्तारला आहे. परदेशी विमा कंपन्यांना दुर्गम भागात प्रत्यक्ष काय घडले याची चौकशी करणे कठीण जात असल्याने, या टोळ्यांनी त्याचा फायदा घेतला आहे. या प्रकरणामुळे नेपाळच्या पर्यटन क्षेत्राच्या प्रतिमेला मोठा तडा गेला असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर यावर कडक टीकेची झोड उठत आहे.

- सुदेश दळवी