
विधानसभा, लोकसभा असो अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, पेडणे तालुका नेहमीच आपल्या वेगळेपणाची आणि अस्तित्वाची साक्ष देत आला आहे. राजकीय नेत्यांना आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी तारांकित हॉटेलचे टेबल ते झोपडीतील चुलीपर्यंत प्रचार करावा लागतो, असे गोव्यात काही क्वचित मतदारसंघ असतील. त्या मतदारसंघांच्या यादीत पेडणे तालुका अग्रेसर असणार यात शंकाच नाही.
२०२७ च्या विधानसभा निवडणुका आठ ते दहा महिन्यांवर असताना पेडणे तालुक्यातील दोन्ही मतदारसंघांत आतापासूनच निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. खरे सांगायचे तर, स्वतःच्या कामांचा किंवा विचारांचा प्रचार करण्यापेक्षा, केवळ सत्ताधारी भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी सोशल मीडियावर आपले ‘अस्तित्व दर्शन’ घडविण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. प्रत्येक नेता आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी विविध स्नेहमेळाव्यांचे आयोजन करून आपले संख्याबळ दाखवण्यात गुंतलेला आहे. पाच वर्षे मतदारांना पाहिल्यावर मान वळवणाऱ्यांना आता अचानक इतका पुळका कसा येतो, असा प्रश्न सर्वसामान्य मतदारांना पडणे स्वाभाविक आहे.
पेडणे हा आरक्षित मतदारसंघ आहे. येथील राजकीय समीकरणे अगदी वेगळीच आहेत. आरक्षणामुळे आपापल्या पक्षांचे निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळणे तसे कठीण. येथे कार्यकर्ते आपले अस्तित्व दाखवण्यासाठी एखाद्या उमेदवाराला पुढे आणतात आणि उमेदवारी मिळवण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्नही करतात. पेडणे मतदारसंघात सध्या भाजपचे आमदार प्रवीण आर्लेकर आहेत. दुसऱ्या बाजूने २०२२ चे मगोचे उमेदवार राजन कोरगावकर आपल्या ‘मिशन फॉर लोकल’ संघटने अंतर्गत काम करत आहेत. भाजपचेच माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर आपल्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यातच आणखीन दोन प्रख्यात डॉक्टरांनी समाजकार्य सुरू केले आहे. या सगळ्यांचे लक्ष सत्ताधारी भाजपच्या उमेदवारीवर आहे, अशी चर्चा सुरू आहे. आमदार प्रवीण आर्लेकर उमेदवारीसाठी प्रयत्न करणार, यात शंकाच नाही. दुसरीकडे भाजप-मगो युती आगामी निवडणुकीत कायम राहणार असल्याचे दावे दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते करत आहेत. त्यामुळे पेडणे मतदारसंघ भाजप आपल्याकडे ठेवणार की मगो पक्षाला देणार, हे येणारा काळच सांगेल. पण महत्त्वाचे म्हणजे, मगोचे २०२२ चे उमेदवार राजन कोरगावकर यांची मुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्षांशी जवळीक सोशल मीडियावर गाजत आहे. पूर्वाश्रमीचे भाजपचे काही ज्येष्ठ कार्यकर्ते त्यांच्याबरोबर आहेत. स्वतःचे मतदार असलेले बाबू आजगावकर आपले अस्तित्व दाखवत आहेत. निवडणुकीत उतरण्यास इच्छुक असलेल्या दोन डॉक्टरांना भाजपच्याच काही वरिष्ठ नेत्यांनी पेडण्यात पाठवले आहे, अशीही चर्चा रंगते आहे. पेडणे मतदारसंघात मत मिळवण्याठी प्रयत्न कमी आणि उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.
मांद्रे मतदारसंघात सध्या मगोचे आमदार जीत आरोलकर आहेत. काही दिवसांपूर्वी सत्ताधारी पक्षाच्या एका मंत्र्यांनी, ‘आमदार जीत आरोलकर यांना भाजपचे दरवाजे खुले आहेत,’ असे विधान केले होते. या विधानामुळे मगो - भाजप युतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणे स्वाभाविक आहे. दुसरीकडे भाजपचे माजी आमदार दयानंद सोपटे नेटाने काम करत आहेत, तर काही मतभेदांमुळे अंतर ठेवून असलेले भाजपचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे वजनही अद्याप कायम आहे. ‘पक्षश्रेष्ठीची इच्छा असल्यास घरवापसीला हरकत नाही,’ असे विधान पार्सेकर यांनी यापूर्वीच केले आहे. २०२७ च्या निवडणुकीत भाजप - मगो युती स्थिर राहिल्यास उमेदवारीचा पेच सुटू शकेल, मात्र आमदार जीत आरोलकर यांनी भाजप प्रवेश केल्यास, नेमकी उमेदवारी कुणाला मिळणार, हा प्रश्न कायम राहील.
ही समीकरणे बघितली तर सद्यस्थितीत भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी नेमका कुणाचा हात धरावा? असाही प्रश्न पुढे येतो. मगोचे निष्ठावंत कार्यकर्ते आज भाजपला पाठिंबा देऊन कार्य करत आहेत. त्यांच्या भावनांचा विचार होणार का? एखाद दुसरा मतदारसंघ मगोकडे जाणार का? की दोन्हीही मतदारसंघात भाजपचा उमेदवार देतील? या प्रश्नाचे उत्तर येणारा काळच देईल. तूर्तास कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी कट्ट्यावर बसून भाजप उमेदवारीसाठी सुरू असलेली चढाओढ शांतपणे पहावी. ‘जाहीर होणार तो आपला,’ म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

- साहिल नारूलकर