सोशल मीडियावरील दिखाऊ शुभेच्छांपेक्षा प्रत्यक्ष संवाद आणि घरातील छोट्या मदतीचे महत्त्व दाखवताना पती-पत्नीमधील भावनिक नाते आणि स्त्री-पुरुषांमधील समंजसपणाचा एक गोड आरसा.

महिला दिनाच्या निमित्ताने सकाळपासून सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस पडत असतो. “स्त्री शक्तीला सलाम!", "घराची लक्ष्मी!", "माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती, माझी पत्नी!" अशा पोस्ट्सनी मोबाईल भरून गेलेला आणि इथे घरात मात्र सुमितच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्हांचा डोंगर तयार झालेला.
"ऐक ना निशा... चहा झाला का?"
"हं."
"म्हणजे... झाला का नाही?"
"हो."
सुस्मितच्या कपाळावर आठ्या. 'हो' म्हणजे झाला, की हो म्हणजे होतोय? तो हळू स्वयंपाकघरात डोकावतो. निशा शांतपणे गॅससमोर उभी. चेहरा निर्विकार. आवाज थंड.
"काही झालं का?" तो गोड आवाजात विचारतो.
"काय होणार आहे?"
आता झालं ! नवऱ्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. 'काय होणार आहे?' हा प्रश्न नाही, हा इशारा आहे ! तो परत हॉलमध्ये येतो. मोबाईलवर महिला दिनाच्या पोस्ट्स पाहतो. त्याने कालच एक फोटो टाकला होता - "माझ्या पत्नीला महिला दिनाच्या शुभेच्छा. ती माझी प्रेरणा आहे." पण कमेंट्समध्ये कुठेतरी चूक झाली का? कुणाच्या पोस्टवर जास्त 'लाईक' दिलं का? तो पुन्हा स्वयंपाकघरात जाऊन विचारतो "माझं काही चुकलं का?"
"नाही."
हे 'नाही' म्हणजे नक्कीच 'हो' असतं, हे त्याला लग्नाच्या पाच वर्षांच्या अनुभवाने आता समजायला लागलं होतं.
"मग तू शांत का आहेस?"
"मी शांतच असते."
"अगं, पण तू अशी शांत नसतेस."
"म्हणजे मी कशी असते?"
तो गडबडतो. "नाही म्हणजे... तू बोलकी असतेस. हसतमुख."
"मग आज मी हसत नाही का?"
तो तिच्याकडे नीट पाहतो. तिच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा असते. हे हसू आहे की कुत्सित हास्य? तो शेवटी धाडस करून विचारतो, "आज महिला दिन आहे. काही खास प्लॅन करायचा होता का?"
ती चमचा खाली ठेवते. "तुला आठवलं?"
"अगं, कालच तर पोस्ट टाकली मी !"
"हो, पोस्ट टाकलीस. पण सकाळी उठून एक 'हॅपी विमेन्स डे' असं प्रत्यक्ष म्हटलं असतंस तर बिघडलं असतं का? तू सोशल मीडियावर पोस्ट टाकलास तेवढंच पुरेसं आहे असं तुला वाटतंय?"
आता त्याला कळलं तिच्या रागाचं हेच कारण आहे.
"अगं, मी ऑफिसच्या घाईत होतो..."
"हो, ऑफिस महत्त्वाचं. मी काय आहेच."
तो आता पूर्णपणे बचावात्मक पवित्रा घेऊन म्हणतो, "अगं, मी तुला रोजच मान देतो."
"कसा?"
"मी... मी भांडी कधी कधी धुतो."
"कधी कधी?"
"म्हणजे... आठवड्यातून एकदा."
"आणि त्याचा फोटो काढून स्टेटसला ठेवतोस."
तो हसतो. "अगं, लोकांना प्रेरणा मिळते."
"हममम." क्षणभर शांतता पसरते. मग सुमित खुर्ची ओढून निशा समोर बसतो. "सांग ना खरं. नेमकं काय झालं?"
ती हळू आवाजात म्हणते, "काही मोठं नाही. फक्त एवढंच की महिलादिनी मला 'विशेष' वाटेल असं तू वागावंस असं वाटलं होतं."
"अगं, तू रोजच विशेष आहेस."
"मग रोजच सांग ना तसं."
तो गोंधळतो. "मी सांगतोच की..."
"कधी?"
तो आठवण्याचा प्रयत्न करतो. शेवटचं कधी कौतुक केलं होतंस? कदाचित लग्नाच्या वाढदिवसाला?
"ऐक," ती पुढे म्हणते, "मला मोठे गिफ्ट नको. पण सकाळी उठून एक कप चहा तू बनवला असतास, आणि 'आज तू बस, मी चहा करतो' असं म्हटलं असतंस, तर मला महिला दिन साजरा झाल्यासारखं वाटलं असतं."
तो थोडंसं सावरून म्हणतो, "अगं, मला वाटलं पोस्ट टाकली की झालं."
"सोशल मीडिया दिखाऊ आहे. घरात कसं वागवलं जातं हे अधिक महत्त्वाचं."
तो उठतो आणि म्हणतो, "ठीक आहे. आत्तापासून सुरुवात." तो गॅससमोर उभा राहतो. "चहा कसा करायचा?" ती हसते. "अगं, मला शिकव." ती त्याला चहा पावडर, साखर, पाणी याचं प्रमाण सांगते. तो गोंधळून साखर जास्त टाकतो.
"अरे, इतकी साखर?"
"आज गोडवा वाढवायचा आहे."
चहाचे कप घेऊन दोघंही हॉलमध्ये येऊन बसतात. तो गंभीरपणे म्हणतो, "खरंच सांगतो, मला कधी कधी कळत नाही तू का रागावली आहेस. पण आता समजतंय. कारण तू अपेक्षा ठेवतेस, आणि त्या सांगत नाहीस."
ती हसून म्हणते, "आणि तू अंदाज लावत बसतोस."
"हो. चुकीचा लावतो."
"म्हणूनच संवाद हवा."
तो तिचा हात हातात घेतो. "महिला दिनाच्या शुभेच्छा."
ती हलकंसं म्हणते, "आता वाटलं... विशेष."
तो पुढे म्हणतो, "आजपासून एक नियम. फक्त महिला दिनी नाही, तर प्रत्येक दिवशी थोडं कौतुक, थोडी मदत, आणि थोडं 'धन्यवाद'."
ती डोळ्यांत पाहत म्हणते, "आणि थोडं ऐकणं."
"हो, ते सगळ्यात महत्त्वाचं."
संध्याकाळी तो पुन्हा एक पोस्ट टाकतो, "महिला दिनाच्या शुभेच्छा फक्त पोस्टपुरत्या नसाव्यात. त्या रोजच्या वागण्यात दिसाव्यात. माझ्या आयुष्यातील स्त्रीला जी मला रोज शिकवते की प्रेम म्हणजे संवाद."
यावेळी तो पोस्ट दाखवायला तिच्याकडे जात नाही. कारण त्याला ठाऊक आहे. खरी 'लाईक' तिच्या चेहऱ्यावरच दिसतेय.

सौ. मंजिरी वाटवे