कडू कडुनिंब... पण आरोग्याचा 'गोड' कित्ता!

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
14th March, 11:26 pm
कडू कडुनिंब...  पण आरोग्याचा 'गोड' कित्ता!

अा​​पल्या आजूबाजूला निसर्गात अनेक झाडे आहेत जी आपल्या आरोग्यासाठी खूप उपयोगी आहेत. पण इतकी सगळी औषधी झाडे, ती कधी-कशी वापरायची व त्यांचे औषधी उपयोग कोणते, हे सगळं लक्षात तरी कसं ठेवायचं? या सगळ्या उपयोगी गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी आपल्या ऋषीमुनींनी एक छान युक्ती काढली. त्यांनी आपल्या आहारातील उपयोगी पदार्थ आणि निसर्गातील झाडे यांना आपल्या भारतीय सणांशी जोडले. त्यामुळे झालं असं की, नकळत सणांच्या निमित्ताने आपल्या आजी-आजोबांना या गोष्टी समजल्या व ते या वनस्पती त्या त्या ऋतूत येणाऱ्या सणाला वापरून निरोगी जीवन जगू लागले. त्याच गोष्टी आता तुम्हीसुद्धा समजून नीट वापरल्या तर तुम्ही सुद्धा निरोगी व्हाल. आज अशीच एक सण आणि आरोग्याशी जोडलेली वनस्पती बघूया.

​येत्या आठवड्यात आपण गुढीपाडवा साजरा करणार आहोत. गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाची आनंददायी सुरुवात! या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते, नवीन कपडे घातले जातात आणि गोड पदार्थ खाल्ले जातात. पण या दिवशी एक खास गोष्ट केली जाते, कडुनिंबाची पाने खाणे! कडुनिंब खायचा आहे हे ऐकताच तोंड वाकडं होतं ना? नको तो कडू प्रसाद असं वाटतं. कडुनिंब इतका कडू असताना आपण तो सणाच्या दिवशी का खातो, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. चला तर जाणून घेऊया!

​चैत्र महिन्यात म्हणजे उन्हाळ्याच्या सुरुवातीला शरीरात उष्णता वाढते. यामुळे सर्दी, खोकला आणि त्वचेचे आजार होऊ शकतात. कडुनिंब ही उष्णता कमी करतो, रक्त शुद्ध करतो आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतो. कडुनिंब हा रोग निर्माण करणाऱ्या कीटाणूंशी, जंतूंशी लढतो आणि त्यांना पळवून लावतो. त्यामुळे कडुनिंब थोड्या थोड्या प्रमाणात चटणी किंवा रस काढून चैत्र महिन्यात अधूनमधून घेतल्याने शरीर हेल्दी राहील.

​या कडुनिंबाच्या प्रसादात काय असते?

​कडुनिंब: रक्त शुद्ध करतो.

​गूळ: गोडवा आणि ऊर्जा देतो.

​ओवा: पोट निरोगी ठेवतो.

​मीठ: शरीरातील समतोल राखतो.

​हिंग: पचनशक्ती सुधारतो.

​या सगळ्या गोष्टी एकत्र खाल्ल्याने शरीर निरोगी राहते.

​त्वचेला खाज येत असल्यास कडुनिंबाची पाने पाण्यात उकळून त्या पाण्याने आंघोळ केली असता, खाज कमी होते. पण त्यासाठी तुम्हाला कडुनिंब नीट ओळखता मात्र यायला हवा हं. तुमच्या घराच्या किंवा शाळेच्या आजूबाजूला कडुनिंब आहे का बघा. आणि नसेल तर या गुढीपाडव्याला एखादं कडुनिंबाचं झाड नक्की लावा. कारण ते अनेक आजारांवर आपण औषध म्हणून वापरू शकतो. आणि तुम्हाला आठवत असेल, रंगपंचमीला हिरवा रंग याच कडुनिंबाच्या पानांपासून कसा तयार करायचा ते आपण बघितलं होतं.

​म्हणून यंदा गुढीपाडव्याला कडुनिंबाचे तीर्थ किंवा चटणी घेताना तोंड वाकडं करू नका. कडुनिंबाचे फायदे आठवा आणि आनंदाने हे कडू औषध घ्या आणि त्याचे फायदे तुमच्या मित्र-मैत्रिणींना सुद्धा सांगा. 

​निरोगी राहा, आनंदी राहा! गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!


वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य