वसंत ऋतू आणि आरोग्य

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
07th March, 11:33 pm
वसंत ऋतू आणि आरोग्य

व​​संत ऋतूत सर्दी 
खोकला का होतो?

​आता वसंत ऋतू सुरू झाला आहे. वसंत ऋतू सुरू झाला हे कसे ओळखायचे, निसर्गात या ऋतूत कोणते बदल होतात हे तुम्ही छान समजून घेतले आहे. हळूहळू उन्हाळा जवळ येत आहे आणि दिवसेंदिवस उष्णता वाढत आहे. तरीही तुमच्यापैकी अनेक मुलांना सर्दी खोकला होताना दिसतो. तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का 

उकाडा वाढत असताना सर्दी कशी होते?

​आयुर्वेदात याचे खूप छान कारण सांगितले आहे. हिवाळ्यात हवा थंड असते त्यामुळे शरीरात कफ वाढतो. हा कफ शरीरात साठून राहतो. जेव्हा वसंत ऋतू सुरू होतो आणि वातावरणात उष्णता वाढू लागते, तेव्हा हा साचलेला कफ हळूहळू वितळायला लागतो. त्यामुळे नाक वाहणे, खोकला येणे, घसा खवखवणे अशी लक्षणे दिसू शकतात. वातावरणात खूप गरमी असल्यामुळे घाम खूप येतो, थकवा येतो आणि आपण लगेच आईस्क्रीम, कलिंगड खातो, कोल्ड ड्रिंक, ज्युसेस पितो, एसी लावतो. त्यामुळे ही लक्षणे अजून वाढतात.

​म्हणूनच या ऋतूमध्ये आपल्याला आरोग्याची थोडी जास्त काळजी घ्यावी लागते.

​काय काळजी घ्यावी?

  • खूप थंड पदार्थ जसे की आईस्क्रीम, कलिंगड, कोल्ड ड्रिंक, मिल्क शेक, ज्युसेस, फ्रिजमधले पाणी पिणे टाळा.
  • ​​कोमट पाणी पिण्याची सवय लावा.
  • ​​रोज थोडा व्यायाम किंवा मैदानी खेळ खेळा.
  • ​​गरम आणि ताजे अन्न खा.
  • ​​सतत एसीचा वापर टाळा. खूप उकाडा असेल तर एसी सुरू असलेल्या खोलीत जाण्याआधी नाकपुड्यांना आतून तीळ तेल लावा.
  • ​​खोकला किंवा सर्दी झाली तर लगेच आई वडिलांना सांगा, घरगुती उपाय करा. २ ते ३ दिवसांत त्रास कमी न झाल्यास डॉक्टरांकडून औषधे घ्या.

​आणि हो, थंड पदार्थांचा आस्वाद नक्की घ्या पण वसंत ऋतू संपल्यावर म्हणजेच मे महिन्याच्या सुरुवातीस.

​ऋतूनुसार आपला आहार आणि दिनचर्या बदलली तर आपण नक्कीच निरोगी राहू शकतो.


वैद्य कृपा नाईक,
आयुर्वेदाचार्य