"प्रत्येक मूल हे अद्वितीय असते!" हाताच्या पाच बोटांचे आणि छत्रीच्या चित्राचे उदाहरण देत, विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना आणि त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला शिक्षकांनी कसे जपावे, याचे मार्गदर्शन करणारा हा अनुभवसिद्ध लेख.

प्रत्येक विद्यार्थी अद्वितीय आहे.रोज वर्गात हसतमुख असणारी रुची आज मात्र मान खाली घालून गप्प बसली होती. जवळ जाऊन विचारपूस केली, तेव्हा रडव्या स्वरात म्हणाली, "टीचर, तासाला कोणी नव्हते म्हणून मी चित्र काढत होते. सरांना दाखवले तर ते माझ्यावर ओरडले. यात माझी काय चूक झाली?" मी म्हटले, "रडू नकोस, कदाचित सर कोणत्या तरी व्यापात असतील आणि तू मध्येच चित्र दाखवल्यामुळे ते चिडले असतील." शिक्षक म्हणून शिकवताना मुलेही आपल्याकडून काही अपेक्षा बाळगून असतात. त्यांना व्यक्त व्हायचे असते आणि त्यासाठी ती कोणत्या ना कोणत्या संधीच्या शोधात असतात.
मी माझ्या शैक्षणिक वर्षाचा दुसरा तास चित्र काढण्यासाठी ठेवते. हा एक छोटासा प्रयोगच म्हणा. वर्गात जाऊन मुलांना एक साधे चित्र काढायला सांगायचे, जसे की 'छत्री'. त्यांना वीस मिनिटे द्यायची आणि वेळ पूर्ण झाल्यावर प्रत्येकाकडे जाऊन त्यांनी काढलेली छत्री पाहायची. गंमत म्हणजे, एकही छत्री दुसऱ्यासारखी नसते. कोणाची बंद तर कोणाची उघडी; कोणाची फुलांची तर कोणाची रंगीत ताऱ्यांची. मात्र, प्रत्येकाची छत्री निरनिराळी असते. हे घडते कारण प्रत्येक विद्यार्थी हा 'अद्वितीय' आहे.
मी वर्गात नेहमी सांगते की, ज्याप्रमाणे हाताची पाच बोटे सारखी नसतात, त्याचप्रमाणे प्रत्येक मूल वेगळे असते; पण आपण सर्वांनी मिळून-मिसळून हाताच्या मुठीप्रमाणे एकजुटीने वावरले पाहिजे.
शिक्षकाने शिकवताना प्रत्येक विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता सारखी नसते, याचे भान ठेवून सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेत शिकवले पाहिजे. जर कोणाला एकदा शिकवलेले समजले नाही, तर न कंटाळता दुसऱ्या पद्धतीने पुन्हा समजावून सांगायला हवे.
'थ्री इडियट्स' या चित्रपटामध्ये आमिर खानने सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांचे सुंदर उदाहरण देऊन मुलांच्या अद्वितीयतेबद्दल सांगितले आहे. आता तर 'सर्वसमावेशक शिक्षण' हा नवीन शैक्षणिक धोरणाचा एक अविभाज्य भाग आहे. त्याअंतर्गत शिक्षकांनी मुलांच्या अंगी असलेले गुण ओळखून त्यांना वाव दिला पाहिजे.
वर्गात शिकवताना नानाविध उपक्रम घेऊन कोणाच्या अंगी कोणते गुण आहेत, हे आपण समजून घ्यायला हवे. त्यासाठी आठवड्यातून एक दिवस मुलांसाठी असे खेळ किंवा उपक्रम घ्यावेत, जेणेकरून ती स्वतःला व्यक्त (अभिव्यक्त) करू शकतील. आम्ही आमच्या विद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) अंतर्गत 'अभिव्यक्ती' नावाखाली मुलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्यात मेहंदीपासून फुलांच्या फाती बनवण्यापर्यंतच्या स्पर्धा होत्या. मुलांना त्यात खूप धमाल आली आणि आम्हाला त्यांच्या सुप्त गुणांचे दर्शन घडले.
मी शिकत असताना माझे गुरुजी मला नेहमी चित्र काढण्यासाठी कागद द्यायचे. मी मोठे झाल्यावर 'चित्रकार' होणार, असेच त्यांना सांगायचे. त्यांचे त्या वेळचे प्रयोग मी आजही माझ्या वर्गात वापरते. ते कवितेला स्वतः चाल लावत नसत; उलट आम्हाला सांगायचे की, "तुम्हीच कवितेला चाल लावा, मी ऐकतो." वेगवेगळ्या मराठी गाण्यांचे बोल ते फळ्यावर लिहायचे आणि आम्हाला चाल लावून गायला सांगायचे. प्रत्येकाची चाल वेगळी आणि सुंदर असायची. त्यातूनच गाता-गाता अभ्यास होऊन जायचा. आज आपण शिकवताना सुद्धा पाठाला थोडी चाल लावली किंवा चित्रांच्या माध्यमातून शिकवले, तर अभ्यास खूप सोपा होईल.
शिक्षकाने मुलांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपले आणि त्यांची अद्वितीयता समजून घेतली, तर वर्गात शिकवणे आणि शिकून घेणे, दोन्ही प्रक्रिया सोप्या होतील हे नक्की!

- श्रुती करण परब