वेळ ही जीवनातील सर्वात मौल्यवान संपत्ती आहे. एकदा गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही, म्हणून वेळेचे योग्य नियोजन आणि सदुपयोग करून ध्येय गाठणे हीच यशस्वी जीवनाची आणि उत्तम आरोग्याची खरी गुरुकिल्ली आहे.

मला वेळच मिळाला नाही, सर्वांना पडलेला मोठा प्रश्न म्हणजे काही सांगायचे गेले की सांगायचे वेळ मिळाला नाही. वेळेवर पोहोचत नाही, माझा वेळ कुठे जातो तेच कळत नाही असे बरेच प्रश्न आपल्याला दिवसेंदिवस पडत असतात. "वेळ" हा आपल्या जीवनातील एक अविभाज्य घटक आहे. वेळ आपल्याला बरंच काही शिकवून जातो. प्रत्येक दिवसाचे चोवीस तास असतात, हे चोवीस तास आपण कसे घालवतो ते महत्त्वाचे आहे. वेळ निघून गेल्यावर आपल्याला तिचे महत्त्व कळते. गेलेली वेळ कधीच परत येऊ शकत नाही. वेळेला जास्त प्राधान्य आपण दिले पाहिजे.
वेळेत ती ती गोष्ट झाली पाहिजे असे आपण बर्याचदा ऐकतो. याचाच तात्पर्य एवढंच की वेळेचे पालन करून प्रत्येक काम केले पाहिजे. एकदा त्या गोष्टीची वेळ निघून गेली की मग आपण काहीही करू शकत नाही. आपल्या वेळेचा पूर्ण कोणत्या प्रकारे चांगला सदुपयोग करू शकतो हे आपण शोधले पाहिजे. बहुतेक वेळा आपण आपले जीवन, आपल्या गोष्टींवर विचार करायचा सोडून इतरांच्या जीवनात काय चालले आहे हे पाहण्यात जास्त वेळ घालवतो. त्याचा आपल्याला काही फायदा होत नाही पण आपण मात्र आपली वेळ वाया घालवतो. ही वेळ आपण आपले जीवन कसे चांगले होणार याकडे जर लक्ष केंद्रित केले तर बरेच बदल आपल्या जीवनात घडून येतात.
वेळ नाही असे आपण म्हणतो, पण जीवन महान बनवणारे संत, शास्त्रज्ञ यांना काही दिवसाला ४८ तास मिळाले नव्हते, त्यांनाही आपल्यासारखे २४ तास मिळाले होते पण त्यांनी वेळेचे नियोजन चांगले केल्यामुळे त्यांना त्यांचे ध्येय गाठण्यास मदत झाली. वेळेचे नियोजन हे सर्वांसाठीच महत्त्वाचे आहे मग ते विद्यार्थी असो किंवा सामान्य व्यक्ती. वेळेच्या नियोजनामुळे आपली बरीच रखडलेली कामे मार्गी लागतात. वेळेच्या नियोजनामुळे आपल्या जीवनाला एक चांगली शिस्त लागते.
दुसरी गोष्ट म्हणजे कोणतेही काम हाती घेतले की ते वेळेत पूर्ण करण्याची मानसिक तयारी प्रत्येकाची असली पाहिजे. बऱ्याच वेळा आपली काम संपवण्याची तयारी नसते, मग आपल्याला बऱ्याच गोष्टींना सामोरे जावे लागते. आपण ठरवतो की मी हे काम उद्या सकाळी पाच वाजता उठून करणार पण दुसऱ्या दिवशी सकाळी पाचचा अलार्म वाजला की परत झोपतो. हे मात्र घडू नये कारण जर असं झालं तर आपण आपले ध्येय साध्य करू शकत नाही. वेळेवर नियंत्रण महत्त्वाचे आहे. बरेच विद्यार्थी आपले वेळापत्रक करतात जेणेकरून वेळेचे नियंत्रण चांगले होईल. पण फक्त वेळापत्रक करून चालणार नाही तर ते अमलात आणणे महत्त्वाचे आहे. वेळापत्रकाप्रमाणे आपण कामाचे नियोजन केले पाहिजे.
जेवण, व्यायाम, झोप यांची सुद्धा वेळ ठराविक असली पाहिजे. व्यायाम आपण किती वेळ करणार, सकाळी की संध्याकाळी हे सुद्धा ठरले पाहिजे. काही दिवस व्यायाम करून मध्येच सोडला तर त्याचे विपरीत परिणाम शरीरावर होतात. जेवणाच्या वेळी जेवण करणे गरजेचे आहे. कामामुळे आपण जेवणाची वेळ चुकवतो आणि मग बीपी, शुगर, अपचन यांसारखे धोके वाढू लागतात. सध्याची गरज म्हणजे मोबाईल. फोनशिवाय आपल्याला करमत नाही. बरीच कामे फोनमुळे लवकर होतात पण बहुतेक वेळा हाच मोबाईल आपल्यावर ताबा मिळवतो. सोशल मीडियावर तर आपण बराच वेळ घालवतो. व्हाट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक यावर बराच वेळ जातो. आता मुले देखील अभ्यासाकडे दुर्लक्ष करून मोबाईलकडे आकर्षित होतात. मोबाईल किती वेळ वापरायचा यावर आपले नियंत्रण असणे महत्त्वाचे आहे, नाहीतर डोळे, मेंदू आणि शरीरावर त्याचे वाईट परिणाम दिसू लागतात.
स्वतःच्या आवडी जोपासण्यासाठी आपण आपला वेळ दिला पाहिजे. वेळेचे नियोजन करणे ही आजच्या काळाची गरज आहे.
वेळ...
कधी सांगून येत नाही,
कोणावर येईल सांगता येत नाही
ती कोणासाठी थांबत नाही,
निघून गेल्यावर परत येत नाही
वेळ असला की सरत नाही,
नसला की पुरत नाही
ती कधीच मागून मिळत नाही,
मनात नसेल तर देता येत नाही.

- स्नेहल महाले
पणजी