आरोग्यदायी होळी: घरच्या घरी बनवा नैसर्गिक रंग!

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
21st February, 11:03 pm
आरोग्यदायी होळी:  घरच्या घरी बनवा नैसर्गिक रंग!

आ​​ज आपण एक मजेशीर पण आपल्या आरोग्याशी संबंधित असलेलाच विषय समजून घेणार आहोत. आपला सर्वांचा आवडता होळी आणि रंगपंचमीचा सण! रंग उधळणे, पिचकारीने पाणी मारणे, मित्र-मैत्रिणींसोबत खेळणे – किती मजा ना! मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जाणारा हा सण यायला तसा अजून वेळ आहे. मग इतक्या लवकर आपण हा विषय का घेतला, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल ना? उत्तर सोपे आहे... पुढे वाचा.

​बाजारात खूप सुंदर, चमकदार आणि आकर्षक रंग विकायला आले सुद्धा आहेत. पण यांपैकी बरेच रंग केमिकलयुक्त असतात. असे रंग वापरल्यानंतर आपल्या त्वचेला खाज येणे, पुरळ उठणे, डोळे जळजळणे, केस कोरडे होणे अशा आरोग्याच्या तक्रारी सुरू होतात. तुम्हा लहान मुलांची त्वचा नाजूक असल्यामुळे या रंगांचा जास्त त्रास होऊ शकतो. म्हणून आज आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने नैसर्गिक रंग कसे बनवायचे ते शिकणार आहोत. तुम्हाला रंग तयार करण्यासाठी लागणारे नैसर्गिक साहित्य गोळा करायला पुरेसा वेळ मिळावा, म्हणून हा विषय लवकर घेतला आहे.

​चला, रंगबिरंगी उपक्रमाला सुरुवात करूया!

लाल रंगाचे पाणी:

लाल जास्वंदाची फुले रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी ते पाणी फुलांसकट उकळा. त्यात थोडा लिंबू पिळा. तयार झाला सुंदर लाल रंग! हे पाणी केसांना लागले तरी काहीही नुकसान होत नाही आणि केस धुतल्यानंतर रंग लगेच निघूनही जाईल.

निळ्या व जांभळ्या रंगाचे पाणी:

निळी गोकर्ण (अपराजिता) फुले पाण्यात उकळा. छान फिकट निळा रंग तयार होईल. त्यात थोडा लिंबू पिळला की जांभळे पाणी तयार होईल.

केशरी रंग:

पळस किंवा झेंडूची फुले रात्रभर भिजत ठेवा. सकाळी उकळून गाळून घ्या. सुंदर केशरी रंगाचे पाणी तयार! ही फुले सावलीत वाळवून त्याची पूड करून ठेवा. ही फुलांची पावडर पाण्यात घातली असता फिकट केशरी रंगाचे पाणी तयार होते. पळसाची फुले त्वचेचे आरोग्य टिकवण्यासाठी अत्यंत उपयोगी असतात.

​पिवळा रंग:

१ भाग हळद आणि २ भाग बेसन एकत्र मिसळा. तयार झाला पिवळा रंग! हा नैसर्गिक पिवळा रंग त्वचेसाठी गुणकारी असून त्यातील घटक घरात सहज उपलब्ध असतात.

गुलाबी रंग:

बीटचे (Beetroot) तुकडे थोडेसे पाणी घालून मिक्सरमधून फिरवून घ्या. गाळून त्याचा रस काढा. हा रस मैदा किंवा मक्याच्या पिठात मिसळा. सुंदर गुलाबी रंगाची पेस्ट तयार! बीटचा रस मक्याच्या पिठात मिसळून खिडकीत किंवा बाल्कनीत येणाऱ्या उन्हात वाळवून गुलाबी रंगाची पावडर (गुलाल) तयार करता येते.

​हिरवा रंग:

कडुनिंबाची पाने पाण्यात उकळा. हिरव्या रंगाचे पाणी तयार होईल. कडुनिंब त्वचेसाठी खूप उपयुक्त आहे. त्वचेला खाज येत असेल किंवा पुरळ असेल, तर हे पाणी आंघोळीसाठी वापरले जाते.

​तयार झालेल्या रंगांमध्ये आपल्या आवडीच्या अत्तराचे थोडे थेंब घालून तुम्ही सुगंधी रंगीत पाणी तयार करू शकता. या नैसर्गिक रंगांचा वापर केल्यास त्वचा, केस आणि डोळे सुरक्षित राहतातच, शिवाय पर्यावरणाला आणि आपल्या पाळीव प्राण्यांनाही त्रास होत नाही. अशा सुरक्षित आणि आरोग्यदायी पर्यायांची निवड सण साजरे करताना करूया.

​या होळीला शक्य असेल तो नैसर्गिक रंग तयार करून वापरूया आणि आरोग्यदायी, पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करूया. तुमच्या मित्र-मैत्रिणींपैकी प्रत्येकाने एक-एक रंग तयार केला, तरी एकत्र खेळताना वेगवेगळे रंग मिळतील आणि खूप मजा येईल! चला तर मग, आपल्या आवडीचा नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी साहित्य जमा करायला सुरुवात करा.

​होळी व रंगपंचमीच्या रंगमयी शुभेच्छा!


वैद्य कृपा नाईक,
आयुर्वेदाचार्य